रवी नाईक अनंतात विलीन; फोंड्यात लोटला जनसागर, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 07:30 IST2025-10-16T07:29:30+5:302025-10-16T07:30:26+5:30
खडपाबांध येथील शंकर पार्वती मंदिर परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवी नाईक अनंतात विलीन; फोंड्यात लोटला जनसागर, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : माजी मुख्यमंत्री आणि सावंत मंत्रिमंडळातील कृषिमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी मध्यरात्री वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने फोंड्यातील खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. काल, बुधवारी दुपारपर्यंत नाईक यांचे पार्थिव निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे नेते, सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित राहून नाईक कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी सहा वाजता खडपाबांध येथील शंकर पार्वती मंदिर परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवी यांचे पुत्र रितेश नाईक यांनी मंत्राग्नी दिला.
रवी नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपचे राष्ट्रीय नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला. सायंकाळी अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह मंत्री, आमदार, खासदारांसह कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता. गोमंतकीय राजकारणात ४० वर्षांहून अधिक काळ आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती. नाईक यांच्या निधनाने भंडारी समाजाचा आधारवड हरपला, अशी भावना राज्यातील बहुजन समाजातून व्यक्त झाली.
मंगळवारी मध्यरात्री खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना नाईक यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच रात्रीच खडपाबांध येथील त्यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी झाली. काल, बुधवारी नाईक यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रांग लागली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्यासह अनेकांनी रवी यांच्या पत्नी पुष्पा, पुत्र रितेश व रॉय यांसह कुटुंबीयांचे सांत्वन केले.
नाईक यांना बहुजन समाजाचे नेते का म्हटले जाते हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले, अशा शब्दात नगराध्यक्ष अनंत नाईक, भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष देवानंद नाईक, समाजाचे नेते संजीव नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रुद्रेश्वर संस्थांनचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी यावेळी देवस्थान व समस्त भंडारी बांधवांच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री दिवसभर फोंड्यात
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे काल सकाळी दहाच्या सुमारास खडपाबांध येथे दाखल झाले. अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांनी रवी यांच्या पत्नी तसेच रितेश व रॉय यांचे सांत्वन केले. दिवसभर ते खडपाबांध येथे नाईक यांच्या घरी बसून राहिले. संध्याकाळी साडेपाच वाजता पार्थिवाला अग्नी दिल्यानंतरच त्यांनी जाणे पसंत केले.
शोकसभेत जागवल्या आठवणी
खडपाबांध येथे अंत्यसंस्कारावेळी शोकसभेत अनेकांनी आठवणी जागवल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, 'जिद्द, चिकाटी याचे दुसरे नाव म्हणजेच रवी नाईक. काही तरी वेगळे करून दाखवण्याचे त्यांचे स्वप्न जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आढळून येते. गोव्यातील प्रत्येक युवकाने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या भूमीसाठी जे योगदान दिले ते आम्ही कदापि विसरणार नाही.
तीन दिवसांचा दुखवटा
मंत्री रवी नाईक यांच्या निधनावर शोक व्यक्त करून सरकारने काल, बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद राहिली. परंतु ज्या शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत, त्या पूर्ण करण्यात आल्या. दरम्यान, कालपासून तीन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.
लोक झाले भावूक
नाईक यांच्या निधनाचे वृत्त अचानक धडकल्याने अनेकांना धक्का बसला. रवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना अनेकजण गहिवरले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्यासह अनेकांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या. रवी यांच्या अखेरच्या भेटीविषयी अंत्यसंस्कारावेळी आणि अंत्यदर्शनास आलेल्यांनी भावना व्यक्त केल्या.
अनेकांना बसला धक्का
सभापती गणेश गावकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, सर्व मंत्री, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, चर्चिल आलेमाव, काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आपच्या नेत्या आतिशी मार्लेन, मुख्यमंत्र्यांचे वडील पांडुरंग सावंत, आदींनी नाईक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. नाईक यांनी फोंड्यात सर्वसामान्य लोकांसाठी खूप काही केले. झोपडपट्टीतील लोकांची त्यांनी केलेली कामे कोणीही विसरणार नाहीत. त्यामुळेच झोपडपट्टी भागातील वृद्ध महिलांना अश्रू आवरणे कठीण जात होते.
गावडेंना शोक अनावर
आमदार तथा माजी कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना शोक अनावर झाल्याचे दिसत होते. दिवसभर ते ओक्साबोक्शी रडत होते. त्यांच्या कन्येनेसुद्धा ज्यावेळी नाईक यांचे पार्थिव पाहिले, त्यावेळी तिला आपले हुंदके आवरता आले नाहीत. तिने शवपेटीला मारलेल्या मिठीने सर्वांचे मन हेलावले.