रेशन दुकानदार 'अन्न कल्याण'चे ब्रँड अॅम्बेसेडर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:44 IST2026-03-12T09:42:13+5:302026-03-12T09:44:38+5:30
फोंडा येथील नव्या नागरी पुरवठा, विभागीय कृषी कार्यालयाचे लोकार्पण

रेशन दुकानदार 'अन्न कल्याण'चे ब्रँड अॅम्बेसेडर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : नव्या जागेत स्थलांतरित केलेल्या नागरी पुरवठा खात्याचे कार्यालय आणि फोंडा विभागीय कृषी कार्यालयाचे बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. वन नेशन वन रेशन तसेच पंतप्रधान अन्न कल्याण योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार ब्रँड अॅम्बेसेडर बनत आहेत, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
कार्यक्रमाला आमदार गोविंद गावडे, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश नाईक, कलामंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, सरपंच नावेद तहसीलदार, नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर, संचालक जयंत तारी यांसह नगरसेवक व पंच उपस्थित होते.
नागरी पुरवठा खात्याच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, 'नागरी पुरवठा खात्याचे कार्यालय चांगल्या जागेत स्थलांतरित व्हावे, अशी लोकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आज ती पूर्णत्वास आणताना सरकारला आनंद होत आहे. कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा सुविधा मिळावी, अशी सरकारची मनीषा होती.
त्यामुळेच नव्या जागेचा शोध घेत होतो. फोंडा नगरपालिकेच्या नव्या मार्केट कॉम्प्लेक्समध्ये कार्यालयाचे स्थलांतर होत असून आगामी काळात इतर काही सरकारी कार्यालयेसुद्धा मार्केट कॉम्प्लेक्स इमारतीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. पालिकेलासुद्धा काही प्रमाणात महसूल मिळण्यास मदत होईल.
सरकारने उभारलेल्या इमारतींचा चांगल्या तन्हेने विनियोग होण्यास मदत होईल. इमारतीत ज्या त्रुटी आहेत, त्या काही दिवसांत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत करणार आहोत. नागरी पुरवठा खात्याच्या आणखी एका कार्यक्रमात राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वेगवेगळ्या योजनांतर्गत निधीचे व पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गतसुद्धा स्वस्त धान्य दुकानदारांना विविध प्रकारचे अनुदान वितरित करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की 'नागरिकांना अन्न पुरवठा सुरळीत व्हावा व तो शेवटच्या माणसापर्यंत व्यवस्थित पोहोचावा, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.
देशात कुणीही उपाशी राहू नये हे सरकारचे धोरण आहे. या कल्पनेत स्वस्त धान्य दुकानदार महत्त्वाचा दुवा आहेत. योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम दुकानदार करत आहेत.
वन नेशन वन रेशन तसेच पंतप्रधान अन्न कल्याण योजना लोकांपर्यंत घेण्याबाबत स्वस्त धान्य दुकानदार बँड अॅम्बेसेडर बनत आहेत. सरकारचा प्रतिनिधी बनून तुम्ही जे काम करत आहात, ते उल्लेखनीय आहे. याचे कमिशन वाढवण्याच्यादृष्टीने सरकार प्रयत्न करीत आहे.
अर्थसंकल्पात स्वस्त धान्य दुकानदारासंबंधी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तुमच्या समस्या संचालकांमार्फत आमच्या कानावर पडल्या आहेत. त्यांचा विचार सरकार सकारात्मकतेनेच करेल. सुरुवातीला संचालक जयंत तारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.