रामा काणकोणकर यांची प्रकृती अद्यापही अस्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:37 IST2025-10-02T11:36:11+5:302025-10-02T11:37:11+5:30
उपचार सुरू असूनही, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा खूपच मंदगतीने होत आहे.

रामा काणकोणकर यांची प्रकृती अद्यापही अस्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांची प्रकृती अजूनही अस्थिर आहे, असे त्यांच्या पत्नी रती काणकोणकर यांनी सांगितले. रामा यांना अजूनही दृष्टीदोष, वारंवार डोकेदुखी, वेदना आणि बोलण्यात अडचण यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे ते नीटपणे बोलू शकत नाहीत असे त्यांनी पणजी पोलीस स्थानकाजवळ पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रती काणकोणकर म्हणाल्या की, हल्ल्याचा आघात अजूनही कायम आहे, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. उपचार सुरू असूनही, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा खूपच मंदगतीने होत आहे आणि ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे बरे झालेले नाहीत.
१८ सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांच्यावर दिवसाढवळ्या क्रूर हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे ते जबर जखमी झाले होते. डोक्यात रक्ताच्या गाठी होण्यासह गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या पत्नीने राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.
रक्ताच्या गाठी असल्या तरी धोका नाही
रामा काणकोणकर यांच्या पत्नी रती काणकोणकर यांनी रामा यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे सांगितले होते. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रक्ताच्या गाठी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या गाठी लहान असल्यामुळे ते धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. तसेच उपचाराने त्या गाठी निघून जातील असेही सांगितले आहे.