राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:35 IST2025-11-16T12:35:00+5:302025-11-16T12:35:49+5:30
डिचोली तालुका पर्यटन कॉरिडोर म्हणून विकसित; हरवळे पर्यटन केंद्र ठरणार मुख्य आकर्षण.

राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : जागतिक पातळीवरील पर्यटक आज गोव्यात समुद्र किनाऱ्यावर येतात. आता डबल इंजिन सरकारने गोव्यात आध्यात्मिक पर्यटन, ग्रामीण पर्यटन, होम स्टे अशा माध्यमातून पर्यटकांना आकर्षित केले आहे. सरकारने ग्रामीण भागातील लोकांना स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हाती घेतले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने २० कोटी रुपये खर्च करून श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसर व हरवळे धबधबा परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. हरवळे-साखळी येथे शनिवारी या प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजप महिला नेत्या सुलक्षणा सावंत, खासदार सदानंद तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार प्रेमेंद्र शेट, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार केदार नाईक, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, रितेश नाईक, प्रमोद बदामी यांच्यासह पर्यटन खात्याचे अधिकारी व देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद तानावडे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी आभार मानले.
राज्यातील आध्यात्मिक पर्यटन ही एक पर्वणी ठरणार आहे. गोव्यातील अतिशय सुंदर प्राचीन मंदिरे पर्यटकांना भुरळ घालतात. हरवळे येथील रुद्रेश्वर मंदिर तसेच येथील धबधब्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने योजना आखली आहे. त्यामुळे किनारी भागात येणारा पर्यटक ग्रामीण भागात वळू लागला ला असून लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार, उद्योग-व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार : सावंत
रुद्रेश्वर मंदिरात गेली अनेक वर्षे प्रत्येक सोमवारी मी दर्शनाला येत असतो. साखळीत राहत असल्याने इथे येऊन देवाचे दर्शन घेतल्यानंतर वेगळीच अनुभूती येते. या परिसराचा विकास करताना येथील फूल विक्रेत्यांना छोटे गाळे उभारून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
तसेच या ठिकाणी असलेला धबधबा ३६५ दिवस प्रवाहित राहावा यासाठीही आमचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. साखळी येथील प्राचीन किल्ल्याचे ही सुशोभिकरण पूर्ण होणार असून तेही एक वेगळे आकर्षण ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्याबरोबरच त्यांनी या सरकारच्या इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांविषयी यावेळी माहिती दिली.