लुथरा बंधूंना गोव्यात आणण्यासाठी प्रक्रिया; लुथरा बंधूंकडे ४२ 'शेल' कंपन्या, चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:02 IST2025-12-12T12:57:11+5:302025-12-12T13:02:21+5:30
थायलंडमध्ये ताब्यात घेतलेल्या सौरभ आणि गौरव लुथरा यांना लवकरात लवकर गोव्यात आणण्यासाठी गोवा पोलिस केंद्रीय संस्थांशी सतत समन्वय साधत आहेत.

लुथरा बंधूंना गोव्यात आणण्यासाठी प्रक्रिया; लुथरा बंधूंकडे ४२ 'शेल' कंपन्या, चौकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हडफडेंतील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब आग प्रकरणातील फरारी मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनाही गोव्यात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर हे दोघे दिल्लीस्थित भाऊ फरार झाले होते. आग लागल्याची बातमी पसरल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत, म्हणजेच रविवार दि. ७ रोजी पहाटे नवी दिल्लीतून इंडिगोच्या विमानाने पहाटे ५:३० वाजता दोघेही फुकेट-थायलंड येथे पसार झाले. गोव्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय माहिती गोळा करण्यासाठी इंटरपोलकडून 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केली होती. त्यानंतर फुकेत-थायलंड येथे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
लुथरा बंधूंना शक्य तेवढ्या लवकर गोव्यात आणू : मुख्यमंत्री
थायलंडमध्ये ताब्यात घेतलेल्या सौरभ आणि गौरव लुथरा यांना लवकरात लवकर गोव्यात आणण्यासाठी गोवा पोलिस केंद्रीय संस्थांशी सतत समन्वय साधत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या मदतीने या दोघांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय एजन्सींसह गोवा पोलिस अधिकाऱ्यांचे एक पथक दोघांनाही भारतात आणण्यासाठी थायलंडला जाईल. आग दुर्घटनेतील सर्व २५ बळींना न्याय दिला जाईल. आतापर्यंत सहाजणांना अटक झालेली आहे.'
गोवा सरकारने केलेल्या औपचारिक विनंतीनंतर केंद्र सरकारने लगेचच गौरव आणि सौरभलुथरा यांचे पासपोर्ट निलंबित केले. या कारवाईमुळे त्यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना भारतात आणण्याची कायदेशीर औपचारिकता सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रत्यार्पण प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. त्यानंतर गोव्यात आणले जाईल अशी अपेक्षा आहे.
लुथरा बंधूंकडे ४२ 'शेल' कंपन्या
हडफडे येथे आग दुर्घटनेत २५ बळी घेतलेला 'बर्च बाय रोमियो लेन' क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांच्यावर ४२ 'शेल' कंपन्या चालवल्याचा आरोप असून यातील बहुतांश कंपन्या एकाच दिल्लीतील पत्त्यावर नोंदणी झालेल्या आहेत. चौकशीत असे उघड झाले आहे की, उत्तर पश्चिम दिल्लीत २५९०, ग्राउंड फ्लोअर, हडसन लाइन या एकाच पत्त्यावर या कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. डझनभर कंपन्यांमध्ये एकाच पत्त्याची पुनरावृत्ती ही आर्थिक तपासात संभाव्य मनी लाँड्रिंगच्या संशयाला पुष्टी देत आहे.
दोघांचेही पासपोर्ट निलंबित
दरम्यान, गोवा सरकारने केलेल्या औपचारिक विनंतीनंतर केंद्र सरकारने या भावांचे पासपोर्ट निलंबित केले आहेत. लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने त्यांना तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. लुथरा बंधूंचे असे म्हणणे होते की, 'त्यांचा थायलंड दौरा व्यावसायिक कामासाठी व पूर्वनियोजित होता.
सौरभ आणि गौरव या दोघांचेही पासपोर्ट निलंबित केल्यानंतर काही तासांतच पुढील घडामोडी घडल्या. या कारवाईमुळे भावांना फुकेतहून पुढे जाण्यापासून रोखले गेले. दोघांचे पासपोर्ट ताब्यात घेतल्याचे विशेष फोटो समोर आले आहेत. त्यांच्यावर निष्काळजीपणा तसेच सदोष हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.