चोर्ला घाटात खाजगी आराम बस उलटली, बारा प्रवासी जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 05:51 PM2024-04-07T17:51:11+5:302024-04-07T17:53:46+5:30

जखमींवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ३० पेक्षा जास्त प्रवासी होते. एस. आर. ट्रॅव्हल्सची ही आरामबस हैदराबादवरून गोव्याच्या दिशेने येत होती.

Private comfort bus overturns at Chorla Ghat, twelve passengers injured | चोर्ला घाटात खाजगी आराम बस उलटली, बारा प्रवासी जखमी 

चोर्ला घाटात खाजगी आराम बस उलटली, बारा प्रवासी जखमी 

नगरगाव : चोर्ला घाटामध्ये खाजगी आरामबस उलटून बारा प्रवासी जखमी  झाले. सकाळी हा अपघात घडला. जखमींवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ३० पेक्षा जास्त प्रवासी होते. एस. आर. ट्रॅव्हल्सची ही आरामबस हैदराबादवरून गोव्याच्या दिशेने येत होती.

घटनास्थळी व पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, चोर्ला घाट सुरू झाल्यावर पहिली दोन ते तीन वळणे पार केल्यानंतच्या एका वळणावर चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला कलंडली. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलेसुद्धा प्रवास करीत होते. हा अपघात घडला तेव्हा बहुतांश प्रवासी झोपेत होते. कोसळलेल्या बसमधील प्रवाशांनी एकच आक्रोश सुरू केला. मुलांच्या रडण्याचा आणि ज्येष्ठ नागरिकांनी केलेला मदतीचा धावा ऐकून पाठोपाठ येणाऱ्या भाजी घेऊन जाणाऱ्या गाड्यांतील चालक, सहाय्यकांनी मदतकार्य केले. सर्वांनी जखमींना बसच्या काचा फोडून तसेच आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर काढले. बसमधील सीटमध्ये अडकलेल्या जखमी ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढून त्यांना रस्त्याकडेला झोपविण्यात आले. पाणी देत जखमींना धीर देण्यात आला.

दरम्यान, या अपघातात कोणाला फारशी दुखापत न झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांतून काहीजणांना केरी येथे आणून सोडण्यात आले. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी  घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. दोघा जखमींवर साखळी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर उर्वरीत दहा जणांना पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवून देण्यात आले.
 

Web Title: Private comfort bus overturns at Chorla Ghat, twelve passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.