प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:54 IST2025-06-24T12:53:34+5:302025-06-24T12:54:42+5:30

डिचोलीत शणै गोंयबाब जयंती उत्सव कार्यक्रम, कोंकणीतून विकास साधावा.

preserving regional languages is important said cm pramod sawant | प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ संकल्पना पूर्ततेसाठी प्रादेशिक भाषांच्या संवर्धनाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. कोकणी ही गोव्याची प्रादेशिक भाषा व राजभाषा आहे. गोव्यात कुणीच भाषेचा द्वेष करीत नाहीत. कोंकणी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मागच्या पन्नास वर्षात जे कार्य झाले नाही, त्याहीपेक्षा मोठे योगदान मुख्यमंत्री या नात्याने आपण या सहा वर्षात दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

डिचोली येथील हिराबाई झांट्वे स्मृती सभागृहात गोवा कोंकणी अकादमी आणि डिचोली कोंकणी सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शणै गोंयबाब यांच्या १४८वा जयंती उत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व शणै गोंयबाब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, डॉ. पूर्णानंद च्यारी व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून कोंकणी भाषेच्या जतन आणि संवर्धनसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोंकणीसाठी भरीव योगदान दिलेल्या सुदत्त मांद्रेकर, मुकेश थळी, विनायक गोवेकर, डॉ. पूर्णानंद च्यारी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कोंकणीतून साहित्यिक घडावेत

कोंकणी भाषेत नवे साहित्यिक घडणे काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी कोकणी भाषेचे उत्तम ज्ञान आत्मसात करून परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास साधावा. आज अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, डिचोली कोंकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष रूपेश ठाणेकर, गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद चारी व मान्यवर उपस्थित होते. प्रशांत चणेकर यांनी स्वागत केले. कोंकणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र उसापकर यांनी सूत्रसंचालन केले. रूपेश ठाणेकर यांनीही स्वागत केले.
 

Web Title: preserving regional languages is important said cm pramod sawant