इफ्फीची तयारी जोमात; मुख्यमंत्र्यांकडून आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:39 IST2025-11-12T08:38:45+5:302025-11-12T08:39:36+5:30
जुन्या गोमेकॉच्या खुल्या आवारात उद्घाटन सोहळा

इफ्फीची तयारी जोमात; मुख्यमंत्र्यांकडून आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात दि. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (दि. ११) पणजी येथील आयनॉक्सजवळील जुन्या गोमेकॉ संकुलाच्या परिसरात तयारीची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत गोवा मनोरंजन संस्थेचे सीईओ अश्विन चंद्र सरव्यवस्थापक मृणाल वाळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, यंदा इफ्फीचे उद्घाटन खुल्या पद्धतीने होणार आहे. आयनॉक्सजवळील जुन्या गोमेकॉ संकुलाच्या बाहेरच व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. याच व्यासपीठावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. तसेच येथे ५०० व्हीव्हीआयपींची बसण्याची व्यवस्था असणार आहे, तर लोकांसाठी बसण्याचीही व्यवस्था या संकुलाच्या समोर करण्यात येणार आहे. सुमारे १५०० लोकांची ही आसनव्यवस्था असणार आहे. इफ्फी संचालक आणि केंद्रीय सरकारच्या मंत्र्यांच्या गेल्या वर्षी केलेल्या शिफारशींनुसार यंदा खुल्या आवारात उद्घाटन सोहळा करण्याचे ठरविले आहे.
इफ्फीची संपूर्ण तयारी १९ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. खासकरून उद्घाटनासाठी आवश्यक असणारे व्यासपीठ, आसनव्यवस्थेसह इतर तयारी पूर्ण होईल. याकाळात वाहतूक व्यवस्था योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी वाहतूक विभागाने नियोजन केल्याची माहितीही, मुख्यमंत्र्यांनी दिली.
उद्घाटनाचा कार्यक्रम जवळपास दोन तास चालणार आहे व त्यांनतर चित्ररथ परेड असणार आहे. आतापर्यंत शिगमो किंवा कार्निव्हल चित्ररथ परेड अनेकांनी पहिली आहे; पण यंदा चित्रपटांवर आधारित चित्ररथ परेडमध्ये सहभागी असणार आहेत, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
यंदा चित्रपटांवर आधारित चित्ररथ परेड असणार : सावंत
सर्व गोमंतकीयांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचा आनंद घेता यावा, यासाठी यंदा खुल्या पद्धतीने उद्घाटन सोहळा होणार आहे. आयनॉक्सच्या पार्किंग परिसरात रेड कार्पेट टाकण्यात येणार आहे, जिथून सर्व फिल्मस्टार एन्ट्री करणार आहेत.