गोव्याच्या नद्या दूषित का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:22 PM2018-10-12T13:22:39+5:302018-10-12T13:36:34+5:30

गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे.

Pollution in Goa's rivers | गोव्याच्या नद्या दूषित का? 

गोव्याच्या नद्या दूषित का? 

googlenewsNext

- किशोर कुबल 

पणजी - गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे. या नद्या पोहण्यासाठी असुरक्षित बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ शास्रज्ञ तसेच अभ्यासक बबन इंगोले यांनी याबाबत खालीलप्रमाणे प्रकाश टाकला. 

कारखान्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, औद्योगिक तसेच हॉटेलचा कचरा, प्लास्टिक कचरा, जैव वैद्यकीय कचरा, नदी तटांवर आलेली अतिक्रमणे, अमर्याद वाळू उपसा, बार्जमधून खनिज वाहतूक तसेच इंधन गळती ही काही प्राथमिक कारणे मानली जातात. डॉ. बबन इंगोले म्हणाले की, ‘ गोव्यातील नद्या दूषित होण्याची कारणे वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळी आहेत. शेतांमध्ये वापरली जाणारी खते, कीटक नाशके पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहत नद्यांमध्ये येतात. हे कारण राज्यातील सरसकट सर्वच नद्यांना लागू होते. मांडवी नदीचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास कुं डई औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडले जाते. शिवाय खोर्ली, करमळी भागात मासळीवर प्रक्रिया करणारे कारखाने आहेत या कारखान्यांचे सांडपाणीही मांडवीत सोडले जाते. राजधानी शहरात नदीपात्रातील कसिनो जहाजांचा कचरा, सांडपाणी यामुळेही नदी प्रदूषित होते.’

साळ नदीच्या बाबतीत ते म्हणाले की, ‘या पट्टयात असलेल्या बड्या तारांकित हॉटेलचे सांडपाणी आणि विशेष म्हणजे मडगांव शहर आणि परिसरातील कचरा साळ नदीत फेकला जात असल्याने ही नदी प्रदूषित झालेली आहे. एनआयओच्या मार्गदर्शनाखाली या नदीतील गाळ उपसण्याचे काम सध्या चालू आहे.’

झुवारी नदीतील प्रदूषणाबाबत इंगोले यांचे असे म्हणणे आहे की, ‘ कुठ्ठाळीपासून वास्कोपर्यंत नदी काठावर बार्जेस दुरुस्त करणारी शिपयार्डे तसेच मुरगांव बंदरातील बोटींमधून सोडले जाणारे इंधन यामुळे नदी दूषित झालेली आहे. शापोरा तसेच अन्य काही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेला वाळू उपसा हेही या नद्या दूषित होण्याचे कारण आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नद्यांचे काळ कोसळून पडतात आणि त्यामुळे पर्यावरणाचीही मोठी हानी होते.’

वरील दूषित पाण्याचा वापर करणाऱ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यात जैवरासायनिक बायोकेमिकल ऑक्सिजनचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे. लिटरमागे ते ३.0 मिलिग्रॅमपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मांडवी नदी माशेल ते वळवई या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दूषित झालेली आहे असा अहवाल सांगतो. या शिवाय झुवारी नदी कुडचडें ते मडकई तर साळ नदी खारेबांध ते मोबोर या पट्टयात दूषित झालेली आहे.  

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला दिलेल्या अहवालानुसार मांडवी, झुवारी, साळ, तळपण, अस्नोडा, डिचोली, शापोरा, खांडेपार, सिकेरी, तेरेखोल आणि वाळवंटी या नद्या दूषित झालेल्या आहेत. या नद्यांच्या प्रदूषणाबाबत तीन, चार आणि पाच अशा तीन वेगवेगळ्या वर्गवाऱ्या करण्यात आल्या आहेत. काही नद्यांमध्ये हे प्रमाण लिटरमागे १0 ते २0 मिलिग्रॅम, ६ ते १0 मिलिग्रॅम आणि ३ मिलिग्रॅमपेक्षा जास्त आढळून आलेले आहे. 

त्याचबरोबर अस्नोडा नदी अस्नोडा ते शिरसई या पट्टयात दूषित झालेली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण बार्देस तालुक्याला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पाला याच नदीचे पाणी घेतले जाते. डिचोली नदी डिचोली ते कुडचिरें, खांडेपार नदी फोंडा ते ओपा या पट्टयात दूषित झालेली आहे. खांडेपार नदीचे पाणी तिसवाडी तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ओपा जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी घेतले जाते. याशिवाय तेरेखोल, वाळवंटी नदीही काही पट्टयांमध्ये दूषित झालेली आहे.

दरम्यान, मांडवी नदीत कसिनो जहाजांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी येथील कसिनो कार्यालयांवर धडक देऊन कसिनो मांडवीतून हटविण्याची मागणी केली होती. 

अशा आहेत गोव्याच्या प्रमुख नद्या 

झुआरी : (९२ कि.मी.) या नदीला अघनाशिनी नदी असेही नाव आहे.

मांडवी : (७७ कि.मी) या नदीला म्हादई/महादयी नदी अशीही नावे आहेत.

तेरेखोल (२२ किमी). या नदीला आरोंदा नदी असेही नाव आहे.

शापोरा (२९ किमी). या नदीला कोलवाळ आणि कायसुव अशीही नावे आहेत. ही नदी महाराष्ट्रात उगम पावते. तेथे हिला तिळारी या नावाने ओळखले जाते.

साळ (१६ किमी)

तळपण (११ किमी)

गालजीबाग (४ किमी)

बागा (१० किमी) 

याशिवाय म्हापसा, साळावली, काणकोण अशाही नद्या आहेत. 

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ शास्रज्ञ बबन इंगोले

Web Title: Pollution in Goa's rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.