सत्तेसाठी प्रभाग वाढविण्याचा प्रयत्न; नगरपालिकेत राजकारण तापण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:25 IST2025-08-11T09:25:56+5:302025-08-11T09:25:56+5:30
विजय सरदेसाई यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

सत्तेसाठी प्रभाग वाढविण्याचा प्रयत्न; नगरपालिकेत राजकारण तापण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: येथील पालिकेची सत्ता आपल्या हाती असावी, यासाठी भाजप सरकारने मडगाव नगरपालिका क्षेत्रात अजून दोन प्रभाग वाढवून ते २७करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता जे नगरसेवक आहेत, तेच व्यवस्थित कामे करीत नाहीत, अशा तक्रारी असताना आणखीन प्रभाग वाढवून त्याचा काय फायदा होईल, असा प्रश्न फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
येथील पालिकेत श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त आमदार सरदेसाई यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यांच्यासोबत गोवा फॉरवर्डचे पदाधितकारी व नगरसेवत उपस्थित होते. सरदेसाई म्हणाले, की आपला एखादा प्रभाग बालेकिल्ला आहे असे गृहीत धरून त्याचे दोन प्रभाग करून कोणत्याही परिस्थितीत पालिकेत सत्ता काबीज करणे, हा भाजपा सरकारचा उद्देश आहे. मतदार सुज्ञ आहेत. त्यांना गृहीत धरू नयेत.
फातोर्डा फॉरवर्ड पॅनलची आता पालिकेतील युती संपुष्टात आली आहे. आपण आता मडगाव मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, त्यासाठी आवश्यक सर्व तयारी सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, भविष्यात जर दोन प्रभाग वाढले तर ते कोणत्या विधानसभा मतदारसंघात वाढतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पक्षांतराने समीकरणे बदलली
काँग्रेसचे त्यावेळी ८ नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यावेळी ७ नगरसेवक निवडून आणले होते. सुरुवातीला मडगाव मॉडेल व गोवा फॉरवर्डची युती असल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाचे समर्थन लाभलेले लिंडन पेरेरा यांना नगराध्यक्षपद प्राप्त झाले होते. त्यानंतर कामत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली, त्यात घनश्याम शिरोडकर यांनी अपक्ष उमेदवार व दामोदर शिरोडकर यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. गोपनीय पद्धतीने मतदान घेण्यात आले व नगराध्यक्षपद घनश्याम शिरोडकर यांना प्राप्त झाले. काही दिवसांतच त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल झाला. नंतर झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी दामोदर शिरोडकर यांची निवड झाली होती.
सत्ताधारी गटाकडे १६ नगरसेवक
मडगाव पालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे समर्थक असलेले एकूण १६ नगरसेवक आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे समर्थन असलेले विजय सरदेसाई समर्थक ७ नगरसेवक आहेत, तर दोन नगरसेवक अपक्ष आहेत. सुरुवातीला, २०२१ साली पालिका निवडणूक झाली होती. त्यावेळी आमदार दिगंबर कामत है काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी मडगाव मॉडेल या पॅनलने गोवा फॉरवर्डसोबत युती केली होती. गोवा फॉरवर्डचे एकूण १० नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर आमदार कामत यांनी काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केल्यावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे काही नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला होता.