राजकारणी - पोलीस मटका जुगारात नाहीत, गोवा क्राईम ब्रँचचे न्यायालयात निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 20:46 IST2017-10-03T20:46:18+5:302017-10-03T20:46:23+5:30
गोव्यात मटका जुगार हा संघटित नाही आणि त्यात कुणीही प्रसार माद्यमे, पोलीस आणि राजकीय व्यक्तीचा संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र क्राईम ब्रँचने मुंई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सादर केले आहे.

राजकारणी - पोलीस मटका जुगारात नाहीत, गोवा क्राईम ब्रँचचे न्यायालयात निवेदन
पणजी: गोव्यात मटका जुगार हा संघटित नाही आणि त्यात कुणीही प्रसारमाध्यमे, पोलीस आणि राजकीय व्यक्तीचा संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र क्राईम ब्रँचने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सादर केले आहे.
मटका जुगार प्रकरणात तपास करणा-या क्राइम ब्रँचने खंडपीठात मंगळवारी तपासाचा अहवाल सादर केला. त्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा उल्लेख आहे तसेच टाकण्यात आलेल्या छाप्यांचीही माहिती आहे. विशेष म्हणजे मटका जुगारात कोणत्याही प्रसार माध्यमांचा, पोलिसांचा आणि राजकीय व्यक्तींचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी एक किरण म्हणून राजकारण्याचा उल्लेख केला होता. परंतु कुणा राजकारण्याचे संबंध असल्याचे पुरावे सापडले नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
क्राईम ब्रँचचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी खंडपीठात सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रात गोव्यात संघटीत मटका लॉबी वगैर नसल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५४६ छापे टाकण्यात आले आणि त्यात १६१७ जणांना अटक करण्यात आली तर १५.१७ लाख रुपये जप्त करण्यात आल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर मटका लॉबी ही संघटीत नसेल तर हे अटक करण्यात आलेले संशयित स्वत:च मटका चालवित होते काय असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान गोव्याचे विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यात मटका जुगाराच्या चिठ्ठ्या मिळाल्याची आणि त्यानंतर त्यांची करण्यात आलेल्या चौकशीची माहितीही क्राईम ब्रँचकडून खंडपीठाला देण्यात आली आहे. मटका जुगारावर कारवाई करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ए पी लवंदे यांच्या देखरेखेखाली विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात एक अधीक्षक व उपअधीक्षक आणि दोन निरीक्षकांचा समावेश आहे.