जि.प.साठी ७५ ते ८० टक्के मतदान शक्य, राजकीय विश्लेषकांचा अंदाज; रणधुमाळी जोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:30 IST2025-12-16T09:30:47+5:302025-12-16T09:30:47+5:30
राज्य निवडणूक आयोगानेही जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

जि.प.साठी ७५ ते ८० टक्के मतदान शक्य, राजकीय विश्लेषकांचा अंदाज; रणधुमाळी जोरात
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ७५ ते ८० टक्के मतदान होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. राज्य निवडणूक आयोगानेही जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी कोविड महामारीचा प्रभाव नुकताच ओसरू लागला होता; परंतु मतदानावर परिणाम झालाच. लोक भीतीने घराबाहेर पडले नाहीत व त्यामुळे केवळ ५६.८६ टक्के मतदान झाले. ते गेल्या काही वर्षातील सर्वात कमी मतदान होते. २०२२ च्या निवडणुकीत सर्वाधिक ७७.३९ टक्के मतदान पाळी मतदारसंघात, तर सर्वांत कमी ३७.७७ टक्के मतदान दक्षिण गोव्यातील राय मतदारसंघात झाले होते. २०२० मध्ये उत्तर गोव्यात ६ तर दक्षिण गोव्यात ४ मतदान केंद्रे संवेदनशील होती. यंदा अजून संवेदनशील मतदान केंद्रे जाहीर झालेली नाहीत.
एकही बिनविरोध नाही
२०२० च्या निवडणुकीत सांकवाळ मतदारसंघातून भाजप उमेदवार अनिता थोरात बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे तेथे मतदान झाले नव्हते. आता यंदा, येत्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदारसंघांमध्ये मतदान होईल. कारण एकही बिनविरोध निवडून आलेला नाही.
उमेदवार ओळखीचे असतात : कुतिन्हो
'स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेहमी लोकांचा प्रतिसाद लाभतो, कारण उमेदवार ओळखीचे असतात. जास्त लोकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, यासाठी उमेदवारही प्रयत्न करतात. उमेदवार ओळखीचे असल्याने मतदानास दांडी मारण्याचे प्रकार तुलनेत कमी घडतात. २०२० मध्ये 'कोविड'चा मतदानावर परिणाम झाला होता. मात्र, यावेळी मतदान ७५ ते ८० टक्क्यांवर जाईल' असे राजकीय विश्लेषक क्लिओफात कुतिन्हो यांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी आयोगाचे प्रयत्न आहेत. स्थानिक व पक्षीय पातळीवर निवडणुका होत असल्याने मतदान लक्षणीय होईल. - मिनीन डिसोझा, अध्यक्ष, राज्य निवडणूक आयोग.