पंतप्रधान मोदी २८ रोजी गोव्यात; प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मूर्तीचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 08:45 IST2025-11-10T08:44:33+5:302025-11-10T08:45:15+5:30
२७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यत विविध कार्यक्रम होणार आहेत.

पंतप्रधान मोदी २८ रोजी गोव्यात; प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मूर्तीचे अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २८ रोजी पर्तगाळ काणकोण येथील श्री जिवोत्तम मठाच्या श्री प्रभू रामचंद्रांच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यासाठी येणार आहेत. २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ३:४५ वाजता श्रीमद विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामींच्या उपस्थितीत पंतप्रधान या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. याबरोबरच थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिंगचेही उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान दुपारी तीन वाजता पोहोचतील आणि सुमारे एक तासासाठी उपस्थित राहतील.
दरम्यान, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी -काणकोण जिवोत्तम मठाच्या ५५०व्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम येथे हाती घेतले आहेत. २६ रोजी मठात श्रीराम दिग्विजय रथ यात्रेचे आगमन होईल. २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यत विविध कार्यक्रम होणार आहेत.
७७ फूट उंचीची मूर्ती
श्री प्रभू रामचंद्रांची ही ७७ फूट उंचीची कांस्य धातूची मूर्ती असून मठाच्या प्राकारात तिची उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २८ रोजी होईल. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
सध्या मठामध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत. आज, सोमवारी नूतन वैदिक संकुल, इंदिराकांत भवन, गोशाळेचे उद्घाटन स्वामीजींच्या हस्ते होणार आहे याचबरोबर वीर विठ्ठल मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंचशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून जिवोत्तम मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.