मोपा विमानतळासाठी झाडे मारण्यास मज्जाव, हरित लवादाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 21:52 IST2017-11-07T21:51:50+5:302017-11-07T21:52:11+5:30
पणजी: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी झाडे पाडण्याचे काम त्वरित बंद ठेवण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.

मोपा विमानतळासाठी झाडे मारण्यास मज्जाव, हरित लवादाचा आदेश
पणजी: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी झाडे पाडण्याचे काम त्वरित बंद ठेवण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती लागू राहणार असल्याचे लवादाने म्हटले आहे. मोपा ग्रीनफील्ड विमानतळासाठी झाडे मारण्याचे काम त्वरित थांबविण्यात यावे यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुणे खंडपीठासमोर मंगळवारी अडीच वाजता सुनावणी सुरू झाली आणि ती ४ वाजेपर्यंत चालली.
या दरम्यान सरकारी वकिलाने आपल्याला विमानाची फ्लाईट चुकणार असल्याचे सांगून सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती लवादाला केली. लवादाने ती विनंती मंजूर करूनही घेतली, परंतु तोपर्यंत झाडे मारण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे सरकारची नामुष्की झाली.
सुनावणी हेतूपुरस्सर पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा याचिकादाराच्या वकिलाकडून करण्यात आला. कारण प्रकल्पासाठी झाडे मारण्याची कामे जोरात सुरू असल्यामुळे या प्रकरणात सुनावणी होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे सुनावणी पुढे जरी ढकलण्यात आली तरी तोपर्यंत या प्रकल्पासाठी झाडे मारण्यास बंदी करण्याचा अंतरीम आदेश देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली ती लवादाने उचलून धरताना पुढील आदेशापर्यंत झाडे कापण्याच्या कामाला स्थगिती दिली. हे प्रकरम आता २२ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पादरम्यान सरकारच्या कृतीला आक्षेप घेणा-या दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पहिली हनुमंत आरोसकर व इतरांची तर दुसरी फेडरेशन आॅफ रेंन्बो वॉरियर्स यांनी दाखल केली होती.