नव्या कॅसिनोविरोधात लोक 'पेटले'; नागरिकांची मनपा कार्यालयावर धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:42 IST2026-02-13T10:41:58+5:302026-02-13T10:42:17+5:30

पद्मश्री लिबिया लोबो यांनी टाकली आंदोलनात उडी

people against new casino citizens storm municipal corporation office panjim | नव्या कॅसिनोविरोधात लोक 'पेटले'; नागरिकांची मनपा कार्यालयावर धडक 

नव्या कॅसिनोविरोधात लोक 'पेटले'; नागरिकांची मनपा कार्यालयावर धडक 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मांडवी नदीतील नव्या कॅसिनोविरोधात पणजीतील नागरिकांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या सभागृहात एकत्र येऊन महापौरांना भेटण्याचा प्रयत्न केला. 'नवा कॅसिनो नकोच,' अशी भूमिका नागरिकांनी घेतली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा पद्मश्री लिबिया लोबो सरदेसाई, 'आप'चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नायक, सामाजिक कार्यकर्त्या सबिना मार्टिन, सिसिल रॉड्रिग्ज व इतर मान्यवर उपस्थित होते. 

या दरम्यान, पोलिसांनी 'आप'चे गोवाप्रमुख वाल्मिकी नायक यांना तेथून जबरदस्तीने बाजूला नेल्याने गोंधळ उडाला. महापौरांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी लिबिया लोबो सरदेसाई म्हणाल्या, 'महापौर रोहित मोन्सेरात यांनी आम्हाला येथे वेळ देऊन चर्चेसाठी बोलविले; पण नंतर तेच भेटण्यास टाळाटाळ करीत राहिले. आम्ही केवळ चर्चेसाठी आलो होतो; पण महापौर आम्हाला भेटलेच नाहीत. कॅसिनोमुळे मांडवी नदी पूर्ण प्रदूषित होणार आहे. आम्हाला मासे खायचे आहेत, कॅसिनोंची घाण नको.

पणजीसह राज्य वाचविण्यासाठी मी नेहमीच लोकांसोबत राहीन.' 'आप'चे वाल्मिकी नायक यांनी म्हणाले की, जुन्या कॅसिनोच्या जागी नवीन कॅसिनो आणले जात असून तोच परवाना वापरला जात आहे असे सरकार सांगते; पण जुना कॅसिनो ३९० लोकांच्या क्षमतेचा होता. तर नवीन कॅसिनोची क्षमता २००० हून अधिक लोकांची आहे. ही जनतेची दिशाभूल आहे.

क्षमतेत मोठा बदल असताना तोच परवाना वैध कसा ठरू शकतो? हे सरकारने आधी लोकांना सांगावे. महापौर सांगतात की कॅसिनोंबाबत आमच्या हातात काही नाही. महापौरांकडे व्यापार परवाना देण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करत महापौरांनी नव्या कॅसिनोला परवाना देऊ नये. आम्ही ही लढाई सुरूच ठेवणार आहोत.'

दरम्यान, पोलिस स्थानकात वाल्मिकी म्हणाले की, सभागृहात उपस्थितांपैकी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये केवळ मलाच वैयक्तिकरीत्या टार्गेट करून उचलून बाहेर आणले. आम्ही कोणताही कायदा हाती घेतला नव्हता. मात्र, या उपनिरीक्षकाने माझे म्हणणे ऐकून न घेता कोणाच्यातरी आदेशावरून मला उचलून बाहेर आणले. हे लोकशाहीविरोधी कृत्य आहे. 

दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांनी विचारणा करताच पोलिस निरीक्षकांनी त्या उपनिरीक्षकाला बोलवून जे कृत्य झाले, ते चुकीचे असल्याचे सांगत पुन्हा असे कृत्य होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी पोलिस निरीक्षकांनी वाल्मिकी नायक यांची माफी मागितली. त्या उपनिरीक्षकानेही माफी मागितली. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी हा विषय तेथेच संपवला.

दरम्यान, महापौर मोन्सेरात यांनी सांगितले की, पालिकेची बैठक १२ रोजी होणारच नव्हती. दोन दिवसांपूर्वी याच काही प्रतिनिधीमधील दोन जण मला भेटले होते तेव्हा मी त्यांना हे स्पष्ट केले होते. मी उपलब्ध नसल्याचेही त्यांना सांगितले होते. तरीही मुद्दाम त्यांनी येथे येत गोंधळ घातला. नवा कॅसिनो रेईश मागुश बाजूने येत आहे. मनपाला याचा संबध येत नाही.

पालिकेतील गोंधळ राजकीय प्रेरित : महापौर मोन्सेरात

'आपचे वाल्मिकी नायक आणि काही पणजीतील सामाजिक कार्यकर्ते मनपाच्या सभागृहात जमत जो काही गोंधळ घातला तो राजकीय प्रेरीत आहे' असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी रात्री उशीरा पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, 'यामध्ये पणजीवासीयांचे प्रतिनिधीत्व करणारे कमी आणि आप तसेच काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे लोकच जास्त होते. मी स्पष्ट करु इच्छितो की मी त्यांना मनपाच्या बैठकीला कधीच बोलवले नव्हते. हे लोक जे पत्रक घेऊन त्यावर सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेण्यास आले होते, हे आमच्या बैठकीत अपेक्षितच नव्हते. पण यातून ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना जो त्रास झाला, तो व्हायला नको होता, यासाठी मी त्यांची माफी मागतो. कॅसिनो विषयाशी महापालिकेचा संबंध येत नाही.'

पोलिसांनी वाल्मिकी यांना बाहेर काढले

'आप'चे गोवाप्रमुख वाल्मिकी नायक हे समर्थकांसह मनपाच्या कार्यालयात शांततेत निषेध करत असताना पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना बाहेर काढले. यावेळी त्यांनी 'भारतमाता की जय' च्या घोषणा दिल्या. या घटनेवेळी उपस्थित संतप्त झाले.

...त्या उपनिरीक्षकाने मागितली माफी

महानगरपालिकेच्या सभागृहात कॅसिनोविरोधात महापौर रोहित मोन्सेरात यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या व शांतपणे निषेध आंदोलन करणारे आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नायक यांना पोलिस उपनिरीक्षकांनी उचलून सभागृहाबाहेर नेले. त्यानंतर संतापलेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी वाल्मिकी नायक यांच्यासमवेत गुरुवारी दुपारी पणजी पोलिस स्थानक गाठून पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांना जाब विचारला. त्यानंतर उपनिरीक्षकांनी माफी मागितली.

दरम्यान, मांडवी नदीत मोठ्या ११२ मीटर लांबीच्या नव्या कॅसिनो जहाजाच्या आगमनाची तयारी सुरू असल्याने सध्याचे कॅसिनो जहाज पाटो पुलाजवळ स्थलांतरित करण्यास कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्याने तात्पुरती परवानगी दिली आहे. कॅप्टन ऑफ पोर्ट्सचे अधिकारी ऑक्टाविओ रॉड्रिग्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जहाजाला ३० एप्रिलपर्यंत तेथे नांगर टाकण्याची मुभा देण्यात आली आहे. ही परवानगी अंतरिम स्वरूपाची असून पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जहाजाचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार आहे.

 

Web Title : पणजी में नए कैसीनो के खिलाफ नागरिकों का विरोध; निगम कार्यालय पर झड़प

Web Summary : पणजी के नागरिकों ने मांडवी नदी में नए कैसीनो का विरोध किया और निगम कार्यालय पर झड़प हुई। आप नेता वाल्मीकि नाइक को जबरन हटाने से आक्रोश फैल गया। नागरिकों ने कैसीनो परमिट और पर्यावरण प्रभाव के बारे में पारदर्शिता की मांग की और निरंतर विरोध का संकल्प लिया। बाद में पुलिस ने नाइक को हटाने के लिए माफी मांगी।

Web Title : Panaji citizens protest new casino; clash at corporation office.

Web Summary : Panaji citizens protested a new Mandovi River casino, clashing at the corporation office. AAP leader Valmiki Naik was forcibly removed, sparking outrage. Citizens demand transparency regarding casino permits and environmental impact, vowing continued resistance. Police later apologized for Naik's removal.