फोंड्याचे तिकीट रितेश की रॉयला हे पक्ष ठरवेल: गोविंद गावडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 06:57 IST2025-11-06T06:57:02+5:302025-11-06T06:57:32+5:30
रवींचा वारसा पुढे नेण्यासाठी संधी द्यावी

फोंड्याचे तिकीट रितेश की रॉयला हे पक्ष ठरवेल: गोविंद गावडे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'फोंडा मतदारसंघात स्व. रवी नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलांपैकी एकाला तरी उमेदवार द्यावी. जर रवी नाईक यांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी; पण उमेदवारी कुणाला द्यायची हे पक्ष ठरविणार आहे, मी मात्र माझे मत मांडले आहे,' असे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.
आमदार गावडे म्हणाले की, निवडणुकीत कुणीही उभे राहू शकतात; पण मी माझे मत व्यक्त केले आहे. रवी नाईक यांनी फोंडा मतदारसंघात आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. अनेक मतदार त्यांच्या कुटुंबाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, हे माझे अजूनही स्पष्ट मत आहे. हेच मत मी मांडले आहे. आता फोंड्यातील उमेदवारीबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष काय तो पुढील निर्णय घेणार आहेत.
मला काम करण्यासाठी पदाची गरज भासत नाही
मुख्यमंत्र्यांनी नुकतेच काही आमदारांना महामंडळ तसेच इतर पद दिले आहे. या विषयावर प्रतिक्रिया देताना आमदार गावडे म्हणाले की, 'मला कुठल्याही पदाची गरज नाही. मी जिथे आहे तिथे खूश आहे. मला लोकांची कामे करण्यासाठी पदाची गरज नाही. काम करण्याची इच्छा असायला पाहिजे. जे कोण काम करत नाहीत, त्यांना अशी पदे हवी असतात.
मी कुठलेही पद नसतानाही लोकांची कामे करू शकतो. म्हणून माझे लोक माझ्यासोबत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी माझ्या मतदारांसोबत सदैव तत्पर असतो. कोणतेही काम करायला मला कधीच पदाची अडचण आलेली नाही, असे गावडे यांनी सांगितले.