पर्तगाळ मठ देशातील आध्यात्मिक यात्रेचे केंद्र बनेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:49 IST2025-11-16T12:49:48+5:302025-11-16T12:49:48+5:30
२८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्तगाळ येथे येणार असल्याने पंचशताब्दी महोत्सवासह दौऱ्याच्या तयारीचा आढावा

पर्तगाळ मठ देशातील आध्यात्मिक यात्रेचे केंद्र बनेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: पर्तगाळ येथील मठाला यंदा ५५० वर्षे पूर्ण होत असल्याने पंचशताब्दीनिमित्त महोत्सव व २८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ७७ फूट उंचीच्या श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण होणार असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी पर्तगाळ येथे भेट देऊन संपूर्ण महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. मठ परिसर हा देशातील एक आध्यात्मिक यात्रेचे केंद्र बनेल व मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एएना क्लिटस्, पोलिस महासंचालक आलोक कुमार व तयारीच्या दृष्टीने लागणारे सर्व सरकारी खात्याचे प्रमुख तसेच नोडल अधिकारी तथा काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर उपस्थित होते.
आयोजनाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले, की या महोत्सवाच्या तयारीकरीता मठ संस्थानने आतापर्यंत १७० कोटी रूपये खर्च केले असून मठाला जरी ५५० वर्षे होत असली तरी मठाने निर्माण केलेली साधन सुविधा पुढील ५०० वर्षाची दृष्टी ठेवून केलेली आहे. पर्तगाळी येथे २७ नोव्हेंबरपासून होणाऱ्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाला राज्य सरकार सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम पर्तगाळी मठाधीश श्रीमद विद्याधीशतीर्थ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत हजारो भाविक सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी राज्य सरकार तसेच पर्तगाळी मठाने केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
२५ रोजीपर्यंत उभा राहणार पुतळा
पंतप्रधान मोदी यांचे आगमन २८ रोजी दुपारी ३.४५ वा. होणार असून संध्याकाळी ४.५७ वा. पर्यंत त्यांचा कार्यक्रम संपणार आहे. या कालावधीत पंतप्रधान प्रभू श्रीरामचंद्रांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर देव दर्शन होईल व भाविकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून उतरणार त्या ठिकाणी खास हॅलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. २५ नोव्हेंबरपर्यंत प्रभू रामाचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्तगाळी मठाधीश श्रीमद विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजाची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर प्रभू श्रीराम, श्री वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन घेतले.