लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्यातून पंढरपूरला पायी वारीने जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावरूनच गोव्यात विठ्ठलाबद्दलचे प्रेम, भक्ती वाढत आहे. राज्यातून आज वीसपेक्षा अधिक पायी वाऱ्या पंढरपूरला जात आहेत. तसेच तीन ते चार हजार गोमंतकीय वारकरी त्यात सहभागी होतात. यातून आमच्या संस्कृती परंपरेला उभारी मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.
साखळी रवींद्र भवनतर्फे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आयोजित 'अवघाची विठ्ठलू' कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी मधुकर परब, यशवंत राणे, ज्ञानेश्वर नाईक, गुणवंती पिळयेकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे संचालक अरुण रेड्डी, रवींद्र भवनचे संचालक श्रीरंग सावळ, श्याम गावस, दिनकर घाडी, रविराज च्यारी यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांकडून सत्कार सोहळा
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शेतकरी मधुकर परब (आमोणा), यशवंत राणे (कुडणे), ज्ञानेश्वर नाईक (मायणा न्हावेली), गुणवंती शाबलो पिळयेकर (आंबेशी पाळी) यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शेतकरी मधुकर परब यांनी शेती ही आमच्या गोव्याची ओळख आहे. त्यासाठी सरकार व मुख्यमंत्री सावंत सुविधा उपलब्ध करून देत आहेत. केवळ शेतकऱ्यांनी शेतात उतरण्याची इच्छाशक्ती बाळगावी व शेती बहरावी, असे आवाहन केले. विर्डी व वेळगे येथील दिंडी पथकांनी रवींद्र भवन परिसरातून रवींद्र भवनात दिंडी सादर करून वातावरणात भक्तिमय रंग भरला. अवघे रवींद्र भवन विठुनामाच्या गजरात दणाणून सोडले.
उद्घाटनाचा मान शेतकऱ्यांना
श्री देव विठ्ठल व शेतकरी वारकरी यांच्या जवळच्या नात्याचे साखळी रवींद्र भवनने व्यासपीठावर दर्शन घडविले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित होते. तरीही कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते करून नवीन पायंडा घालून दिला. मुख्यमंत्र्यांनीही स्वतः हातात पाण्याचा कलश घेऊन तो शेतकऱ्यांच्या हातात दिला व त्यांना सर्वप्रथम तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक व स्वागतही केले.