मांडवीतील कसिनो 100 दिवसात हटवू; पणजीत काँग्रेस उमेदवाराचं जाहीरनाम्यात आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 21:32 IST2019-05-12T21:28:31+5:302019-05-12T21:32:00+5:30
पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रकाशित

मांडवीतील कसिनो 100 दिवसात हटवू; पणजीत काँग्रेस उमेदवाराचं जाहीरनाम्यात आश्वासन
पणजी : काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी रविवारी जाहीरनामा प्रकाशित केला असून मांडवी नदीतून १00 दिवसांच्या आत कसिनो हटवण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. तरुणांना नोकऱ्या, स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये पारदर्शकता, सांतइनेज खाडीची साफसफाई, सुरळीत पाणी पुरवठा, अल्ट्रा मॉडर्न बस स्थानक, रायबंदरमध्ये फुटबॉल मैदान, जेटी व मार्केट इमारत आदी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहेत.
‘पणजी व्हिजन डॉक्युमेंट’ या नावाने प्रकाशित केलेल्या या जाहीरनाम्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना मोन्सेरात म्हणाले की, ‘या पोटनिवडणुकीत रिंगणात असलेल्या सर्व सहाही उमेदवार माझ्यासाठी स्पर्धक आहेत आणि मी प्रत्येकाचे आव्हान गंभीर मानतो. महापालिकेत आयुक्तपदावर आयएएस अधिकारी नकोच, असे माझे ठाम मत असून निवडून आल्यास या पदावर स्थानिक अधिकारी आणेन. कसिनो बंद करावेत, अशी माझी भूमिका नाही. मांडवीतील कसिनो मात्र दूर व्हायला हवेत.'
गिरीश चोडणकर म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात कसिनोंचा कोणताही उल्लेख नाही. आम्ही १00 दिवसात मांडवीतून कसिनो हटवणार आहोत. जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल. बाबुश मोन्सेरात हे निवडून आल्यास पहिल्या सात महिन्यातच त्याची प्रचिती येईल. प्रकाशनाच्यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, महापौर उदय मडकईकर, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, माजी उपमहापौर यतिन पारेख, माजी महापौर तआ नगरसेवक विठ्ठल चोपडेकर, पणजी काँग्रेस गटाध्यक्ष प्रसाद आमोणकर, अॅड. यतिश नायक, माजी महापौर रुद्रेश चोडणकर आदी उपस्थित होते. हा जाहीरनामा तयार करण्याआधी लोकांच्या सूचना मागवण्यात आल्या. व्हॉट्सअप, इमेलद्वारे ५ हजारांहून अधिक सूचना आल्याचे सांगण्यात आले.