लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोव्याची ओळख असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गौतम खट्टर याला तत्काळ अटक करा, अशी आक्रमक मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
खट्टरला 'स्टेट गेस्ट'चा दर्जा देऊन रेड कार्पेट अंथरणाऱ्या आणि त्याच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या मंत्री माविन गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत सरदेसाई यांनी भाजप सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसापूर्वी खट्टरला बेड्या ठोका. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी आणि खट्टरला अटक करून जनतेचा रोष शांत करावा, असेही ते यावेळी म्हणाले.
सरकारची बघ्याची भूमिका
सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत, सरदेसाई यांनी आता 'गॉयच्या पोरजेचो आवाज' ही चळवळ उभी करण्याची घोषणा केली. समविचारी लोकांना एकत्र घेऊन या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जनआंदोलन छेडले जाईल, असे संकेत विजय सरदेसाई यांनी दिले.
आजपर्यंत धार्मिक भावना दुखावल्या नव्हत्या
गोव्यात आजवर अनेक मुख्यमंत्री झाले, पण कोणाच्याही काळात अशा प्रकारे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नव्हत्या, अशी आठवण सरदेसाई यांनी करून दिली. भाजप सरकार जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी अशा प्रवृत्तींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. खट्टरने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल अनुद्गार काढणे, हा गोव्याच्या अस्मितेवर झालेला हल्ला असल्याचे त्यांनी नमूद केले.एकूणच खट्टर प्रकरणामुळे गोव्यातील राजकीय वातावरण तापले असून, विजय सरदेसाई यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Web Summary : Vijay Sardesai demands immediate arrest of Gautam Khattar for offensive remarks against St. Francis Xavier. He seeks the removal of Minister Mavin Godinho for supporting Khattar. Sardesai announces 'Goychea Porjecho Awaaz' movement to oust the government, accusing it of divisive politics.
Web Summary : विजय सरदेसाई ने सेंट फ्रांसिस जेवियर पर आपत्तिजनक टिप्पणी के लिए गौतम खट्टर की तत्काल गिरफ्तारी की मांग की। खट्टर का समर्थन करने के लिए उन्होंने मंत्री माविन गुदिन्हो को हटाने की मांग की। सरदेसाई ने सरकार पर विभाजनकारी राजनीति का आरोप लगाते हुए उसे उखाड़ फेंकने के लिए 'गॉयच्या पोरजेचो आवाज' आंदोलन की घोषणा की।