...तर माझ्याकडे आठ ते नऊ मतदारसंघ टार्गेट असते: मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:56 IST2025-07-07T11:56:39+5:302025-07-07T11:56:56+5:30

मांद्रेतील लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत

otherwise i have a target of eight to nine constituencies said michael lobo | ...तर माझ्याकडे आठ ते नऊ मतदारसंघ टार्गेट असते: मायकल लोबो

...तर माझ्याकडे आठ ते नऊ मतदारसंघ टार्गेट असते: मायकल लोबो

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'मी भाजपमध्ये नसतो तर २०२७च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आठ ते नऊ मतदारसंघ टार्गेट केले असते,' असे आमदार मायकल लोबो म्हणाले. 'मांद्रेचे लोक मला भेटतात. माझ्याकडून त्यांच्या काही अपेक्षा असाव्यात. मला जीत आरोलकर यांना दोष द्यायचा नाहीय. ते नवीन आमदार आहेत', असेही लोबो यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी वरील उत्तर दिले.

आमदार लोबो म्हणाले की, 'गेल्या विधानसभा निवडणुकीत मी बार्देश तालुक्यात पाच मतदारसंघ टार्गेट केले होते. तेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. चार जागा आम्हाला मिळाल्या. म्हापशाची जागा हुकली. कदाचित उमेदवार देण्यात चूक झाली असावी. आता भाजपमध्ये नसतो तर आठ ते नऊ मतदारसंघ टार्गेट केले असते.' 'मांद्रेत जाणार का?' असे विचारले असता लोबो म्हणाले की, 'मांद्रेतील अनेक लोक मला समस्या घेऊन भेटतात. मीच मांद्रेत जायला हवे, असे नव्हे. कामे करणाऱ्या योग्य त्या उमेदवाराला मी पाठिंबा द्यावा, अशी त्यांची अपेक्षा असावी. कदाचित सोपटे किंवा अन्य कोणी अथवा जीतही असू शकतो. मांद्रेत अनेक समस्या आहेत. एका ठिकाणी तर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी शेतातून गुडघाभर पाण्यातून चिखलातून वाट काढत जावे लागते. मी हे अनुभवले आहे.'

काम दाखवावे लागेल

लोबो म्हणाले की, 'मंत्रिपद मिळणारा आमदार २०२७च्या निवडणुकीत पक्षाला फायदा करून देणारा असावा. मग तो त्याच्या जातीच्या किंवा समाजाच्या बाबतीतही असू शकतो. डिलायलांचाही विचार होऊ शकतो. मंत्री बनेल, त्याने पुढील पंधरा महिन्यांत काम करून दाखवावे लागेल.' लोबो यांनी राज्यात केमिकल ड्रग्ज फोफावत चालल्याने चिंता व्यक्त केली. एकेकाळी राज्यात पर्यटन व्यवसायात ७५ टक्के लोक होते. हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे, याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.

...तरी मतदारसंघ सुधारला नाही

लोबो म्हणाले की, 'मांद्रेतून मुख्यमंत्री झाले, परंतु मतदारसंघ सुधारला नाही. येथे सरकारची अर्थात पंचायतीची स्मशानभूमी हवी. मी विधानसभेत हा विषय उपस्थित करणार. जीतबद्दल तक्रार नाही. त्यांना मी दोष देत नाही. माझ्याकडे मांद्रेचे अनेकजण कामे घेऊन येतात. त्यांना माझे काम आवडत असावे. मांद्रेवर माझा डोळा आहे असे नव्हे. तेथील काही लोक अपेक्षा ठेवून आहेत. मांद्रे मतदारसंघ उपेक्षित राहिला आहे. तेथे नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत. लोक बघताहेत की, मी कोणाला तरी पाठिंबा द्यावा.'

टॅक्सीचे दर निश्चित करा

दरम्यान, अन्य एका प्रश्नावर लोबो यांनी टॅक्सी व्यवसायासाठी अॅप नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून गोवा टॅक्सी दर सुनिश्चित करावेत. गोवा माइल्स व इतरांचे दर समान असावेत, असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांकडे हा विषय आपण बोललो आहे. अॅप आणून परप्रांतीय कंपन्यांची मक्तेदारी आम्हाला नकोय. ओला, उबरला आमचा विरोध आहे. पर्यटकांनी मोबाइलवर टॅक्सी दर डाउनलोड करावेत व सरकारने निश्चित केलेल्या दरांनुसार भाडे द्यावे.

एक किंवा दोन मंत्री बदलतील

'तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे का?' या प्रश्नावर लोबो म्हणाले की, 'प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडून माझ्या मंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव जायला हवा. मोठे बदल असणार नाहीत. गावडेंच्या जागी एसटी समाजाच्याच आमदाराची मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. तसेच आणखी एक किंवा दोन मंत्री बदलतील, असे मला वाटते. राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक व विधानसभा अधिवेशन झाल्यानंतरच या गोष्टी होतील.'

अधिवेशनानंतर फेरबदल

दरम्यान, अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत घेतलेल्या भेटीबद्दल विचारले असता लोबो म्हणाले की, 'मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल १५ ऑगस्टपर्यंत थांबा, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनानंतरच फेरबदल होतील. त्याआधी काही घडणार नाही, असे आमदार लोबो यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: otherwise i have a target of eight to nine constituencies said michael lobo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.