...तर बार्देश उत्तर भारतीयांच्या हाती जाणार: आमदार विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:13 IST2025-07-01T13:09:06+5:302025-07-01T13:13:07+5:30
म्हापशात गोवा फॉरवर्डच्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या

...तर बार्देश उत्तर भारतीयांच्या हाती जाणार: आमदार विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : उत्तर भारतीयांची दादागिरी होत असून, बार्देश भागात त्यांचे वर्चस्व सुरू आहे. गोव्यात गोवेकर अल्पसंख्याक होऊ लागले आहेत. त्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केला. तसेच सरकारातील पारदर्शकता संपुष्टात आली असून, भविष्यात बार्देश तालुक्यावर उत्तर भारतीय आपले वर्चस्व गाजविणार असल्याचे सरदेसाई म्हणाले.
सोमवारी म्हापशात गोवा फॉरवर्डचा जनता दरबार पार पडला. यावेळी आमदार विजय सरदेसाई बोलत होते. माजी आमदार किरण कांदोळकर, महासचिव दुर्गादास कामत, उत्तर गोवा जिल्हा महासचिव संतोष सावंत, दीपक कळंगुटकर आदी पक्षातील नेते यावेळी उपस्थित होते. विविध ज्वलंत प्रश्न म्हापशात गोवा फॉरवर्डच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात स्थानिकांनी उपस्थित केले.
अनेक सरकारी कार्यालये खासगी जागेतून चालवली जातात तर दुसऱ्या बाजूने सरकारकडून जागा लिज करारावर देण्यात आल्या आहेत. सरकारच्या मानव संसाधन मंडळाकडून नोकर भरतीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक केली जात असल्याचे देवीदास पणजीकर यांनी निदर्शनाला आणून दिले. किरण कांदोळकर, अॅड. महेश राणे यांनीही आवाज उठवला.
पोलिस बदलीला राजकीय आशीर्वाद
एकाच स्थानकावर तीन वर्षांहून अधिक काळ सेवेत असलेल्या पोलिसांच्या बदल्या करण्याचे सत्र सरकारकडून हाती घेण्यात आले होते. मात्र, अनेकांच्या अद्यापही राजकीय आशीर्वादामुळे बदल्या करण्यात आल्या नाहीत. तसेच काहींनी तर त्याच स्थानकावर कार्यान्वित असलेल्या वाहतूक विभागात बदली करवून घेतल्याचे हणजूण येथील एका महिलेने निदर्शनाला आणले.
बार्देश, पेडणेतून निवडणूक
बार्देश तसेच पेडणे तालुक्यातून निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावर थेट उत्तर न देता लोकांनी मांडलेले मुद्दे सोडविण्यास आपण यशस्वी ठरल्यास लोक भविष्यात सहकार्य करतील, असे सरदेसाई म्हणाले. लोकांचे प्रश्न न सोडविल्यास ते जवळ करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांची कामे केल्यास लोक त्याची परतफेड करतील. लोकांनी मांडलेले प्रश्न, त्यांचे मुद्दे आपण ऐकून घेतले असून, उपस्थित प्रश्न विधानसभेत विविध माध्यमातून मांडले जाणार आहेत. तसेच जे प्रश्न सरकारकडून सोडविले जाऊ शकतात ते राजकारण बाजूला सारून त्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करणार. म्हापसा पालिकेकडून लागू करण्यात आलेली कर प्रणाली भाडेकरूंकडून भाड्यासह घरपट्टी वसूल करण्याचा प्रकार म्हणजे पालिकेचा संस्थात्मक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही आमदार सरदेसाई यांनी केला.