पत्नीच्या स्मृतीतून फुलला ऑर्किडचा मळा; निवृत्त बँक अधिकाऱ्याचा अभिनव प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:59 IST2026-03-06T12:51:49+5:302026-03-06T12:59:04+5:30
कारोणा-हळदोणा येथे ५ हजार ऑकिंड रोपांची लागवड, युवकांसाठी प्रेरणा

पत्नीच्या स्मृतीतून फुलला ऑर्किडचा मळा; निवृत्त बँक अधिकाऱ्याचा अभिनव प्रयोग
लोकमत विशेष, प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: निवृत्तीनंतर निवांत जीवन जगण्याऐवजी शेतीत नवे प्रयोग करून दाखवणारे कारोणा-हळदोणा येथील निवृत्त बैंक अधिकारी मेल्वीन फर्नाडिस यांनी आपल्या शेतात ऑर्किड फुलांची लागवड करून बार्देश तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मात्र, या प्रवासामागे पत्नीची प्रेरणा दडल्याचे मेल्वीन यांनी सांगितले. सुमारे पाच हजार ऑर्किड रोपांची आधुनिक पद्धतीने लागवड करत त्यांनी युवकांसाठी प्रेरणादायी मार्ग उघडला आहे.
कारोणा-हळदोणा येथील निवृत्त बैंक अधिकारी मेल्वीन फर्नाडिस यांनी करून बार्देश आपल्या शेतात ऑर्किड फुलांची लागवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. सुमारे ५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारलेल्या पॉलीहाऊसमध्ये त्यांनी पाच हजार ऑर्किड रोपे वाढवली असून अशा प्रकारचा प्रयोग करणारे ते तालुक्यातील पहिले शेतकरी मानले जात आहेत.
फर्नाडिस यांनी सांगितले की, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत पुण्यातील एका रोपवाटिकेतून टिश्यू कल्चर पद्धतीने तयार केलेली सुमारे पाच हजार ऑर्किड रोपे खरेदी करण्यात आली. ही रोपे कारोणा येथील शेतात उभारलेल्या पॉलीहाऊसमध्ये वाढवली जात आहेत. ऑर्किडच्या रोपांना आवश्यक ओलावा मिळावा यासाठी नारळाच्या काथ्यांचा वापर केला जात आहे. तसेच पॉलीहाऊसमध्ये स्प्रिंकलर आणि फॉगर यंत्रणा बसवण्यात आली असून उष्णतेच्या वेळी धुके निर्माण करून वातावरण थंड ठेवले जाते. त्यामुळे रोपांची वाढ योग्य प्रकारे होत आहे.
आधुनिक शेतीचा नवा मार्ग
बार्देश तालुक्यात पारंपरिक पिकांबरोबर फुलशेतीचे प्रयोग कमी प्रमाणात दिसून येतात. अशा परिस्थितीत मेल्चीन फर्नाडिस यांनी पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून ऑर्किडची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कमी जागेत अधिक उत्पादन आणि बाजारपेठेत चांगली मागणी असलेल्या फुलांची निवड करून त्यांनी आधुनिक शेतीचा नवा मार्ग दाखवला आहे.
भावनिक प्रेरणा
निवृत्तीनंतरही नवे काहीतरी करण्याची जिद्द आणि शेतीबद्दलची आवड यामुळे त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला. मात्र, या मागे एक भावनिक प्रेरणा दडलेली आहे. आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी हा प्रकल्प साकारला आहे. पत्नीला ऑर्किड फुलांची विशेष आवड होती. ती जेव्हा जेव्हा बैंकॉक, दार्जिलिंग, श्रीलंका, नेपाळ अशा ठिकाणी प्रवासाला जात असे, तेव्हा तेथून ऑर्किडची रोपे घेऊन येत असे. त्या आठवणींनी प्रेरित होऊन त्यांनी ऑकिंड लागवडीचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर तिच्या स्मृती जपण्यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन तिला समर्पित केला.
ठळक मुद्दे
५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर पॉलीहाऊस उभारणी.
पुण्यातील रोपवाटिकेतून ५ हजार टिश्यू कल्चर ऑकिंड रोपे.
स्प्रिंकलर व फॉगर यंत्रणेद्वारे तापमान नियंत्रण.
बार्देश तालुक्यातील अभिनव फुलशेतीचा प्रयोग.