विरोधकांचा आवाज बुलंद होणार: युरी आलेमाव; विधानसभेच्या २७ जागा जिंकण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:52 IST2026-04-11T08:51:56+5:302026-04-11T08:52:14+5:30
अमित पालेकर यांचा काँग्रेस प्रवेश

विरोधकांचा आवाज बुलंद होणार: युरी आलेमाव; विधानसभेच्या २७ जागा जिंकण्याचे लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'काँग्रेस पक्षाचा आणि एकूणच विरोधकांचा आवाज आता अधिक बुलंद होईल' असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी काल व्यक्त केला. आपचे माजी गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष सर्व शक्तीने सरकारविरोधात संघर्ष करील. येत्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्ष २७ जागा जिंकेल, असा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
आम आदमी पक्षाचे माजी नेते अॅड. अमित पालेकर यांनी शुक्रवारी मेरशी येथे आयोजित सोहळ्यात काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्त्यासह प्रवेश केला. यावेळी युरी आलेमाव बोलत होते. या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी अमित पालेकर म्हणाले की, 'काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मी पक्षात प्रवेश केला, याचा फार आनंद आहे. पक्षाकडून मिळेल ती जबाबदारी पार पाडणार आहे.
पालेकर यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे सदस्यत्वाचा अर्ज सुपूर्द केला. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते आलेमाव,
निरीक्षक डॉ. अंजली निंबाळकर, हळदोणेचे आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतिक्षा खलप, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, अमरनाथ पणजीकर, समील वळवईकर, सुनील कवठणकर, केतन भाटीकर व अन्य उपस्थित होते. काँग्रेस जी जबाबदारी देणार ती मी पार पाडेन, शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेसमध्ये राहीन, विश्वासघात करणार नाही, असे पालेकर म्हणाले.
विरोधी पक्षनेते युरी म्हणाले की, विरोधकांची बाजू मजबूत होत असून पुढील सरकार विरोधक स्थापन करतील व गोव्याला भाजपच्या भ्रष्ट राजवटीपासून मुक्त करतील. अनेक लोक काँग्रेस पक्षाशी जोडले जात आहेत पक्ष मजबूत होत आहे.
काँग्रेसच बदल घडवेल
अमित पालेकर म्हणाले, ज्या लोकांनी देवासमोर शपथ घेतली व पक्षांतर केले, त्यांनी केवळ देवाचीच शपथ मोडली नाही, तर ज्यांनी ज्यांनी त्यांना मतदान केले, त्यांचाही विश्वासघात केला. त्यामुळे जनता अशा लोकांना कधीही माफ करणार नाही. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. सांताक्रुझ मतदारसंघात अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. सांताक्रुझमध्ये काँग्रेसच बदल घडवू शकते असा मला विश्वास वाटतो.
'आपचे नेते म्हणाले पक्ष सोडा'
अॅड. पालेकर म्हणाले की, 'माझी आई मेरशी गावची दोन वेळा सरपंच होती. माझा राजकीय प्रवास हा कमी वयात सुरू झाला. २०२२ साली मी आम आदमी पक्षातून विधानसभा निवडणूक लढवली. युती व गोमंतकीय हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भाजपचा पराभव करायचा असेल तर युती ही हवी. आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडे जेव्हा मी युतीबाबतचा विषय मांडला, तेव्हा त्यांनी मला पक्ष सोडा, असे सांगितले. मी त्या पक्षाला कधीही फसवले नाही. गोव्यात बदल घडविण्याची गरज आहे. बदल घडला तरच गोवा वाचेल' असे पालेकर म्हणाले