मराठी भाषा टिकली, तरच संस्कृती टिकेल; मराठी राजभाषा समितीकडून समाजकल्याण मंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 09:00 IST2023-03-23T08:59:34+5:302023-03-23T09:00:01+5:30
या प्रकारामुळे मराठीचे खच्चीकरण होत आहे.

मराठी भाषा टिकली, तरच संस्कृती टिकेल; मराठी राजभाषा समितीकडून समाजकल्याण मंत्र्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसाः समाजात मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वापर होत असताना आजही राज्य सरकारकडून तिची उपेक्षा होत आहे. दुसरीकडे मराठीचा वापर शासकीय व्यवहारात करण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असून ही दुर्दैवाची बाब आहे. या प्रकारामुळे मराठीचे खच्चीकरण होत आहे.
या स्थितीकडे सरकारसह जनतेचे लक्ष वेधण्यासाठी मराठी राजभाषा समितीने नव्याने सर्व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडण्याचे ठरवले आहे. समितीच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान मराठी टिकली, तर संस्कृती टिकेल, असे मनोगत मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.
मराठी शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत आणि तशा शाळा निर्माण करण्याकडे भर द्यावा, असेही ते म्हणाले. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर, उपाध्यक्ष अशोक नाईक, अॅड. मनोहर अडपेकर, शानुदास सावंत, मच्छिंद्र च्यारी, शिवराम पोकळे, माजी नगरसेवक तुषार टोपले व मराठीप्रेमी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"