'दामबाबचा ज्याच्या डोक्यावर हात तोच मडगावचा आमदार'; दिगंबर कामत यांना विजयाची खात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:39 IST2025-09-12T11:37:52+5:302025-09-12T11:39:37+5:30
मडगावमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार तयार झाले आहेत व त्यांनी कामही सुरू केले आहे, त्याबद्दल विचारले असता कामत यांनी हे उत्तर दिले.

'दामबाबचा ज्याच्या डोक्यावर हात तोच मडगावचा आमदार'; दिगंबर कामत यांना विजयाची खात्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'ज्याच्या डोक्यावर दामबाबचा हात तो मडगावचा आमदार. मडगावकरांचा आशीर्वाद आणि दामबाबची कृपा यामुळेच मी वर्ष १९९४ मध्ये प्रथम आमदार बनलो व आजपावेतो विधानसभेत आहे. दामबाब व मडगावची जनता माझ्यासोबत आहे', असे म्हणत बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी वर्ष २०२७ च्या निवडणुकीतही आपणच निवडून येऊ, अशी खात्री व्यक्त केली.
मडगावमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार तयार झाले आहेत व त्यांनी कामही सुरू केले आहे, त्याबद्दल विचारले असता कामत यांनी हे उत्तर दिले. 'तुम्ही मुख्यमंत्री असताना तयार केलेला २०२१ चा प्रादेशिक आराखडा लोकक्षोभामुळे स्थगित ठेवावा लागला याचे अजूनही वाईट वाटते का?' या प्रश्नावर कामत म्हणाले की, 'चार्लस कुरय्या हे माझे चांगले मित्र. माझ्या विनंतीवरूनच त्यानी आराखडा तयार करण्याची तयारी दाखवली. त्यावेळी त्यांनी एक अटही घातली होती ती अशी की, या कामात कोणताही दबाव आपल्यावर आल्यास आपण राजीनामा देईन. मी मुंबईला त्यांना दोन ते तीनवेळा भेटलो व याबाबतीत कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असे आश्वस्त केल्यानंतरच त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, नंतर ज्या पद्धतीने हा प्रादेशिक आराखडा स्थगित ठेवावा लागला हे दुर्दैवच म्हणावे लागेल.'
कामत म्हणाले की, 'मडगावच्या राजकारणात कोण प्रवेश करतेय याचीही मी चिंता करत नाही. कोणालाही राजकारण येण्याचा अधिकार आहे. मी १९९४ पासून मडगावातून निवडून येतो. माझे दार मडगावच्या जनतेसाठी सदैव खुले असते. सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. मी मुख्यमंत्री असतानाही लोकांना भेटत होतो. आताही भेटतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी माझे काम पाहून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संमतीने मला मंत्रिपद दिले आहे.
मला फरक पडत नाही
कामत म्हणाले की, विरोधकांनी तसेच कोणीही माझ्यावर टीका केली म्हणून काहीच फरक पडत नाही. मी लोकांच्या भल्यासाठी काम करतो. म्हणून गेली अनेक वर्षे निवडून येतो. काहीजण 'देवाचा माणूस' म्हणून टीका करतात. पण याचाही फरक पडत नाही. उलट आनंद होतो की काही नास्तिक लोकही माझ्यामुळे देवाचे नाव घेतात. माझी देवावर खूप श्रद्धा आहे. दामबाबाचा आशीर्वाद आणि मडगावच्या लोकांचे प्रेम आहे. ज्याच्यावर दामबाबचा आशीर्वाद, तो मडगावात कधीच पराभूत होऊ शकत नाही. मी वर्तमानात जगतो. इतिहासात ज्या काही गोष्टी घडल्या किंवा भविष्यात घडणार आहेत याबाबत मी कधीच काही बोलत नाही. आज काय आहे त्यावर बोलतो व त्यानुसार काम करतो.