गोव्यातील फातोर्ड्यात एक लाखांचा गांजा जप्त, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 19:14 IST2019-02-06T19:14:06+5:302019-02-06T19:14:29+5:30
अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयाखाली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

गोव्यातील फातोर्ड्यात एक लाखांचा गांजा जप्त, एकास अटक
मडगाव: पर्यटनाचे नंदवन असलेल्या गोव्यात ड्रग्सची प्रकरणे वाढू लागली असून, आज दक्षिण गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी एक लाखांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी सिरिल फर्नांडीस (५९) या स्थानिक इसमाला अटक केली आहे. तो मूळ कुडचडे येथील होडार या गावचा रहिवासी आहे. त्याच्याकडे ८४२ ग्राम गांजा सापडला. आज दुपारी येथील घोगळ भागात पोलिसांनी ही कारवाई केली. संशयिताची स्विफ्ट कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयाखाली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. सिरिल फर्नांडीस हा गांजा घेउन आला असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे सापळा रचला होता. घोगळ येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा सापडला. मागाहून सिरील फर्नांडीस याला रितसर अटक करण्यात आली. संशयिताची पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने गांजा कुठून आणला व तो कुणाला विकण्यासाठी नेण्यात येत होता याची सदया पोलिसांनी सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.