दीडशे तरुणांची दहा कोटींची फसवणूक; दाम्पत्याविरोधात पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2024 12:47 IST2024-11-27T12:46:30+5:302024-11-27T12:47:22+5:30
सुमारे १५० तरुणांना परदेशातील हॉटेल उद्योगात नोकरी देण्याच्या बहाण्याने एकूण १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची ही तक्रार आहे.

दीडशे तरुणांची दहा कोटींची फसवणूक; दाम्पत्याविरोधात पोलिसांत तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : नोकरीसाठी पैसे घेऊन फसवणुकीचा एक प्रकार येथील ग्रीन गोवा फाउंडेशन संस्थेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी मडगाव येथील हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे संचालक बाला राव आणि त्यांची पत्नी शांती बाला यांच्या विरोधात मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. सुमारे १५० तरुणांना परदेशातील हॉटेल उद्योगात नोकरी देण्याच्या बहाण्याने एकूण १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची ही तक्रार आहे.
मंगळवारी दुपारी ग्रीन गोवा फाउंडेशनचे रायसन आल्मेदा यांच्यासह काही तरुणांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे संचालक बाला राव आणि त्यांची पत्नी शांती बाला यांनी परदेशातील हॉटेल उद्योगात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या तरुणांकडून लाखो रुपये घेण्यात आल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना यसन आल्मेदा म्हणाले, 'दक्षिण गोव्यातील दीडशे जणांची फसवणूक झाली आहे. हे दाम्पत्य मडगाव येथे कार्यालय चालवते. त्यांनी तरुणांकडून जहाजावर व हॉटेल उद्योगात चांगली नोकरी देण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये घेतले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या दाम्पत्याच्या कार्यालयाला कुलूप आहे. त्यानंतर घाबरलेल्या तरुणांनी नंतर या जोडप्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या दाम्पत्याकडून तरुणांचे पैसे वसूल करण्यात यावेत आणि पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे' असे आल्मेदा म्हणाले. मडगाव येथील शिवम या तरुणाने सांगितले की, ११ जुलै २०२३ रोजी मी नोकरीसाठी अर्ज केला होता. हॉटेल उद्योगात नोकरी मिळवून देण्यासाठी राव यांना सुमारे ८ लाख रुपये दिले होते. मात्र नोकरी न मिळाल्याने सहा महिन्यांनंतर मी माझे पैसे परत मागितले. मात्र राव हे मला खोटे आश्वासन देतच राहिले. आता हे दोघेजण फरार आहेत.
कार्यालयाला कुलूप
पणजीतील जमीर या आणखी एका तरुणाने सांगितले की, मी राव नावाच्या एजंटला ८ लाख रुपये दिले. त्याने मला परदेशात नोकरी देण्याचे आश्वासनही दिले. मात्र आता त्याचे कार्यालय बंद असून त्याचा शोध लागत नाही.'