ओंकार हत्ती तांबोसेमध्येच ठाण मांडून; शेती, बागायतींचे नुकसान, वनविभागाचे प्रयत्न सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:56 IST2025-09-20T12:55:31+5:302025-09-20T12:56:25+5:30
कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हत्ती तज्ञ का आणला नाही ? आम्ही शेताची किती नुकसानी सोसावी ? असे प्रश्न शेतकरी, बागायतदार करत आहेत.

ओंकार हत्ती तांबोसेमध्येच ठाण मांडून; शेती, बागायतींचे नुकसान, वनविभागाचे प्रयत्न सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : शेजारील सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) येथील आलेला ओंकार हत्ती काल (शुक्रवारी) दुसऱ्या दिवशीही तांबोसेतील शेतात ठाण मांडून बसला होता. तो गावातील भात शेती, कवाथे, केळींची झाडे फस्त करण्यावर मग्न दिसून आला. वनखात्याचे हंगामी कर्मचारी सुतळी बॉम्ब लावून हत्तीला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. पण, कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हत्ती तज्ञ का आणला नाही ? आम्ही शेताची किती नुकसानी सोसावी ? असे प्रश्न शेतकरी, बागायतदार करत आहेत.
ओंकार हा १० वर्षाचा हत्ती पाच-सहा दिवसांपासून पेडणे तालुक्यातील कडशी, मोपा, तोरसे, तांबोसे भागात फिरत आहे. त्या हत्तीची इतर ठिकाणी रवानगी करण्यासाठी वन खात्याचे पथक या परिसरात तैनात आहे. ज्या ठिकाणी हत्ती नासधूस करतो, त्याच्यापासून पाचशे मीटर अंतरावर राहून वनखात्याचे कर्मचारी सुतळी बॉम्ब लावून त्याला तेथून हाकलवून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याचा हत्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येते. हत्ती गेल्या दोन दिवसांपासून तांबोशेतील शेतात ठाण मांडून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीची वातावरण आहे. हत्तीमुळे शेतकऱ्यांना आपल्या बागायतीत, शेतात जाता येत नाही.
आधी भात फस्त, मग केळीवर ताव
शेतकऱ्यांनी सांगितले, की हत्ती तज्ञ व प्रशिक्षित हत्ती आणून या हत्तीला आपल्यासोबत नेऊन नियोजित ठिकाणी सोडावे. सध्या हत्तीने मोठ्या प्रमाणात भात शेती आणि केळीच्या झाडाना लक्ष्य केले आहे. पीक खाल्ल्यानंतर तीन तास त्याच शेतामध्ये तो विश्रांती घेतो. तेथून तो केळीच्या बागायतीकडे वळतो तेथे एक-दोन केळीची झाडे पाडतो, असा प्रकार दोन दिवसांपासून सुरू आहे.