राज्यात आण्विक वीज प्रकल्प: मनोहरलाल खट्टर; शक्याशक्यता अहवाल तयार करण्याचे बैठकीत निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 07:16 IST2025-05-13T07:15:36+5:302025-05-13T07:16:42+5:30
याप्रसंगी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, नगर विकासमंत्री विश्वजित राणे उपस्थित होते.

राज्यात आण्विक वीज प्रकल्प: मनोहरलाल खट्टर; शक्याशक्यता अहवाल तयार करण्याचे बैठकीत निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यासंबंधी शक्याशक्यता अहवाल तयार करण्याच्या सूचना सोमवारी गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय ऊर्जा तथा गृहनिर्माण व नगर व्यवहारमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बैठकीत दिली. राज्यातील शहर व वीज क्षेत्राचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला. याप्रसंगी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, नगर विकासमंत्री विश्वजित राणे उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना खट्टर यांनी सांगितले की, 'गोव्यात औष्णिक, जलविद्युत, सौर किंवा अन्य कोणताही वीज प्रकल्प नाही. त्यामुळे आण्विक प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. देशात सध्या केवळ ८ मेगावॅट आण्विक वीजनिर्मिती होते. २०४७सालापर्यंत मोठ्या प्रमाणात आम्हाला अनुऊर्जेची निर्मिती करायची आहे. त्यामुळे राज्यांनी आण्विक प्रकल्पांवर विचार करायला हवा.'
मंत्री खट्टर म्हणाले की, 'शहरी भागांमध्ये ६५२ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारने ठेवला आहे. ५० इलेक्ट्रिकल बसगाड्यांसाठी केंद्र सरकार खर्च देईल. स्वच्छ भारत मिशनखाली ११३ कोटी रुपये लवकरच मंजूर केले जातील. मंत्री खट्टर म्हणाले, की वीज क्षेत्रात गोवा चांगली कामगिरी बजावत आहे. स्मार्ट मीटरसाठी लवकरच निविदा काढल्या जातील. पीएम सूर्य घर बिजली योजनेखाली राज्यात २०२६-२७या आर्थिक वर्षात लोकांना २२ हजार जोडण्या दिल्या जातील.
राज्याला मदतीची हमी
मुख्यमंत्री सावंत की, 'खट्टर यांच्यासमोर आम्ही वीज, नगरविकास, सांडपाणी प्रकल्पांबाबत वेगवेगळे प्रस्ताव ठेवले असून, केंद्राकडून मदत मिळवून देण्याची हमी त्यांनी दिली आहे. राज्यात ९९ मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होते. हे प्रमाण वाढायला हवे, यासाठी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. मडगाव येथेल ३२ एमएलडी, साखळीत ३ एमएलडी व फोंड्यात ८ एमएलडी, असे तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहेत.