आता OTP शिवाय LPG सिलिंडर मिळणार नाही; बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना, २५ दिवसांची अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:30 IST2026-03-16T07:30:52+5:302026-03-16T07:30:52+5:30
नागरी पुरवठा खात्याची सूचना; अफवांवर विश्वास ठेवू नये

आता OTP शिवाय LPG सिलिंडर मिळणार नाही; बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना, २५ दिवसांची अट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नागरी पुरवठा खात्याने एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली असून, एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची अट घातली आहे. मागील सिलिंडरच्या वितरणास पंचवीस दिवस झाल्यानंतरच सिलिंडर बुक करता येणार आहे तसेच ओटीपीशिवाय वितरण केले जाणार नाही.
नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना पुरेसा पुरवठा मिळावा, यासाठी ही पद्धत राबविण्यात येत आहे. सिलिंडरचे न्याय्य वितरण व्हावे आणि अनावश्यक बुकिंग टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरज नसताना बुकिंग नको
गरज नसताना सिलिंडरचे बुकिंग करू नये. सिलिंडरची डिलिव्हरी घरपोच दिली जाईल. त्यामुळे गॅस एजन्सी किंवा डीलरकडे प्रत्यक्ष जाणे टाळावे. अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत स्रोतांमधून मिळालेल्या माहितीलाच ग्राह्य धरावे, असे सांगण्यात आले आहे.
ग्राहकांना बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना
ग्राहकांनी एलपीजी सिलिंडरचे बुकिंग व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल सेवा, एसएमएस / आयव्हीआरएस प्रणाली, भारत बिल पेमेंट सिस्टिम, तेल कंपन्यांच्या मोबाइल अॅपद्वारे, अधिकृत पोर्टलवर जाऊन करावे, दुकानासमोर रांगा लावू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
ओटीपी सादर केल्यानंतरच वितरण
याशिवाय खात्याने आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एलपीजी सिलिंडरचे वितरण केवळ ओटीपी सादर केल्यानंतरच करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी वितरकाला दाखवणे आवश्यक राहणार आहे.
खात्याने सर्व ग्राहकांना या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, यामुळे एलपीजीचे न्याय्य आणि सुरळीत वितरण सुनिश्चित होईल, असे नमूद केले आहे.
गॅस संदर्भातील तक्रारींसाठी तालुकावार अधिकाऱ्यांची नियुक्ती
राज्य सरकारच्या नागरी १ पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने राज्यातील एलपीजी गॅस सिलिंडरचा काळाबाजार, साठेबाजी आणि अनुचित व्यापारी प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.
यासंदर्भात नागरिकांना आपल्या तक्रारी थेट नोंदवता याव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांनी जनतेला आवाहन केले आहे की, एलपीजी वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित तालुका सहायक संचालकांशी दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधावा. गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
येथे साधा संपर्क
खात्याने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, पेडणे तालुक्यासाठी भानू गोलतेकर ८९५६०६१८४२, बार्देशसाठी दीपा फुलारी ८९५६०६१८४०, तिसवाडीसाठी सृष्टी वायंगणकर ८९५६०६१८४४, डिचोलीसाठी रौनक कामत ८९५६०६१८४१, सत्तरीसाठी राजेश आर्लेकर ८९५६०६१८४३ आणि फोंडा तालुक्यासाठी गौरव नाईक ८९५६०६१८४५ यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच धारबांदोडा तालुक्यासाठी गौरव नाईक ९९२३५३०८१२, साष्टीसाठी दर्शन हरमलकर ८९५६०६१८४८, मुरगावसाठी तुळशीदास दाभोळकर ८९५६०६१८४९, सांगे तालुक्यासाठी उल्हास वेळीप ८९५६०६१८४७, केपे तालुक्यासाठी पूजा नाईक गावकर ८९५६०६१८५० आणि काणकोण तालुक्यासाठी उल्हास वेळीप ८९५६०६१८५१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.