अॅप ओळखणार गुन्हेगार; पोलिस महासंचालकांची माहिती, व्हेरिफिकेशन प्रक्रिया होणार सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:26 IST2025-09-16T11:25:58+5:302025-09-16T11:26:21+5:30
राज्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी ही माहिती दिली.

अॅप ओळखणार गुन्हेगार; पोलिस महासंचालकांची माहिती, व्हेरिफिकेशन प्रक्रिया होणार सुलभ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्यटन राज्य असल्याने देश-विदेशांतील लोकांची गोव्यात सतत ये-जा असते. त्यामुळे देशात इतर ठिकाणी गुन्हे करून आलेले कुख्यात गुन्हेगार येथे आढळले आहेत. तसेच राज्यात अनेकदा अतिरेकीही राहून गेल्याचे दिसून आले आहे. मात्र, असे घडू नये यासाठी गोवापोलिसांकडून एक विशेष मोबाइल अॅप उपलब्ध केले जाणार आहे. या अॅपवर कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र अपलोड केल्यास त्याची पूर्ण माहिती मिळेल. यातून पोलिस यंत्रणाही अलर्ट राहणार आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी ही माहिती दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, भाडेकरू पडताळणी प्रभावीपणे केल्याने लपून बसलेले गुन्हेगार सापडत आहेत. आता भाडेकरू तपासणी या अॅपद्वारेच होईल.
महासंचालक म्हणाले की, 'सर्व भाडेकरूंना विशिष्ट आयडी क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे यातून सर्व भाडेकरूंचा एक डेटाबेस पोलिसांकडे तयार होईल. तो गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.' जमीन बळकाव प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित सतत जामिनावर सुटत आहेत हे चित्र योग्य आहे का ? या प्रश्नावर महासंचालक म्हणाले की, संशयिताला जामीन देणे हा न्यायालयाचा विषय असल्यामुळे त्यावर बोलू इच्छित नाही. आतापर्यंत १२ प्रकरणांत आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
ते गँगवॉर नसल्याचा दावा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी फातोर्डा येथे झालेल्या कार अडवून झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होते. मात्र, ते गँगवॉर नसल्याचा दावा अलोक कुमार यांनी केला. त्यांच्या मते फातोर्डा येथील हल्ला हा वैयक्तिक कारणांमुळे होता. ते गँगवॉर नव्हते. कारण, ज्या ग्रुपने हा प्रकार केला, तो फार अधिक काळ त्या ठिकाणी कार्यरत नव्हता. तसेच तो ग्रुप संघटित असल्याचे आणि एका विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचे आढळून आलेले नाही.
पोलिसांविरुद्ध तक्रारी
लोकांकडून पोलिसांविरुद्धही तक्रारी आहेत, याची आपल्याला कल्पना असल्याचे महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले. यामध्ये वाहतूक पोलिसांबाबत अधिक तक्रारी आहेत. त्यासाठी कॅशलेस व्यवहाराची पद्धत लागू करण्यात आली आहे. यामुळे गैरप्रकार थांबले नसले तरी तक्रारी कमी झाल्या आहेत, असे डीजीपी म्हणाले. आतापर्यंत गैरप्रकारात अडकल्यामुळे अनेक पोलिसांना निलंबित आणि बडतर्फही करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.