Notice to Karan Johar's Dharma Productions in goa | करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सला नोटीस, "हे" प्रकरण भोवले

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सला नोटीस, "हे" प्रकरण भोवले

पणजी - बॉलिवूड अभिनेता तसेच निर्माता करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शन्सला चित्रीकरणाच्यावेळी नेरूल येथील 'कोको बीच'वर कचरा केल्या प्रकरणी गोवा मनोरंजन संस्थेने नोटीस बजावली आहे तर दुसरीकडे याप्रकरणी करण जोहरने माफी न मागितल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा 'लोकांचो एकवोट' या संघटनेने दिला आहे. 

एका हिंदी सिनेमासाठी चित्रीकरणाच्यावेळी नेरुल येथील कोको बीच या किनाऱ्यावर कचरा करण्यात आला. पीपीई कीट उघड्यावर फेकण्यात आले. चित्रीकरण संपल्यानंतर कचरा उचलणे ही कंपनीची जबाबदारी होती परंतु साफसफाई न करतात कचरा तसाच टाकून सर्वजण निघून गेले. या पार्श्वभूमीवर कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कोर्टात जाऊ, असा इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहे. कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे तसेच हा कचरा कुजला आहे, असेही संघटनेचे म्हणणे आहे.

लाइन प्रोड्युसरला नोटीस
          
स्थानिकांकडून तसेच वरील संघटनेकडून या प्रकरणी तक्रार आल्यानंतर गोवा मनोरंजन संस्थेने मुंबईस्थित धर्मा प्रोडक्शनच्या लाइन प्रोड्युसरला नोटीस बजावली आहे. परंतु या नोटिशीची दखलही कंपनीने घेतलेली नाही. कचरा तसाच ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आमदाराकडून संताप व्यक्त
        
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे स्थानिक आमदार जयेश साळगांवकर यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, स्थानिक पंचायतीला यापुढे अशा चित्रीकरणासाठी परवानगी देऊ नये असे बजावण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरपासून पुढील दहा दिवस वेरें येथे एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी मागितली होती. त्याला परवानगी देऊ नये, असे ग्रामपंचायतीला मी सांगितले आहे. काही लोक खाजगी जागेत चित्रिकरणासाठी परवानगी देतात. अशी कोणत्याही प्रकारची अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही. माझ्या मतदारसंघात स्वच्छतेला मी अधिक प्राधान्य देत आहे, असे साळगांवकर म्हणाले.
 

Web Title: Notice to Karan Johar's Dharma Productions in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.