निवडणुकीत विरोधकांचा विचार करत नाही: सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:07 IST2025-12-10T13:03:25+5:302025-12-10T13:07:43+5:30
गेल्या ३५ वर्षात मी निवडणूक लढताना विरोधकांचा कधीच विचार केलेला नाही.

निवडणुकीत विरोधकांचा विचार करत नाही: सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: गेल्या ३५ वर्षात मी निवडणूक लढताना विरोधकांचा कधीच विचार केलेला नाही. माझ्या कामाच्या निष्ठेवर व कार्यकर्त्यांच्या बळावर मी पुढे गेलो आहे. मागील निवडणुकीतही आपण अशाच प्रकारे निवडून आलो, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
बोरी बेतोडा, निरंकार व शिरोडा जिल्हा पंचायत निवडणुकीत पूनम सामंत व डॉ. गौरी शिरोडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मंत्री शिरोडकर, आमदार दाजी साळकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, बोरी पंचायतीचे सरपंच सागर नाईक, शिरोडा पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, शिरोडा भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष सुरज नाईक, विद्यमान अध्यक्ष अक्षय गावकर, अवधूत नाईक, चंद्रकांत सामंत, प्रभारी सुवर्णा तेंडुलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील काही दिवस कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र काम करण्याची आवश्यकता आहे, असे शिरोडकर म्हणाले.
यावेळी आमदार साळकर म्हणाले, की शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये ज्याप्रकारे पक्षाचे काम चालू आहे, त्याचा निश्चित फायदा जिल्हा पंचायत निवडणूक लढवताना होणार आहे. माझे घर याचबरोबर स्वयंपूर्ण गोवा अशा विविध योजना राबविल्या आहेत. त्या योजनांचा जनतेला नक्कीच फायदा होणार आहे.
यावेळी गौरी शिरोडकर यांनी सांगितले की, पक्षाने निवडणूक लढण्यासाठी संधी दिली आहे. या संधीचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे. अनेक वर्षापासून मी येथे काम करत आहे.
निवडणूक समितीची बैठक
काराय-शिरोडा येथील आशा सभागृहात आमदार दाजी साळकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी सहकारमंत्री शिरोडकर, भाजपचे उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. अवधूत नाईक यांनी निवड प्रक्रिया व प्रचार यावर माहिती दिली. सहकारमंत्री शिरोडकर यांनी घरोघरी भेट देऊन भाजपाने आतापर्यंत केलेल्या विकासकामांची व योजनांची माहिती दिली. सरपंच सागर नाईक, पंच जयेश नाईक, बेतोड्याचे पंच चंद्रकात सामंत, पच दिनेश गावकर, शैलश बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.