पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी झाडे कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:53 IST2025-10-27T07:52:41+5:302025-10-27T07:53:48+5:30
राज्यभर झोडपले : चक्रीवादळाचा वाढला धोका

पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी झाडे कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जोरदार पावसाने रविवारी राज्याला झोडपून काढले. पावसामुळे मोठी पडझड झाल्याचेही वृत्त असून जनजीवन ठप्प झाले. रविवार असूनही पणजी म्हापसा, वास्को आणि मडगावात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. दरम्यान, अरबी समुद्रात उठलेले 'शक्ती' चक्रीवादळ अजून शमले नसताना आता बंगालच्या उपसागरात 'मोंथा' चक्रीवादळ आकार घेत आहे. त्याचा तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला होता. सकाळच्या सत्रात हलक्या सरी आणि त्यानंतर जोरदार सरी बरसल्या. संध्याकाळच्या सत्रात तर उसंतही न घेता पाऊस पडला. पाऊस इतका जोरदार पडत होता की, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर मच्छीमारांनी टाकलेल्या जाळ्यात तिघेजण अडकण्याचा प्रकार घडला. अग्निशामक दल आणि जीव रक्षकांनी त्यांची सुटका केली.
या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या प्रतीक्षेत असलेली शेते अजून तशीच आहेत. १ परिस्थिती अशीच राहिली तर पिकाची आणखी नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या समुद्र कमालीचा खवळला असून उंच लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. तसेच वाऱ्याचा वेग आणखी वाढणार असल्यामुळे समुद्र आणखी खवळणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न उतरण्याचा इशारा हवामान खाते तसेच कॅप्टन ऑफ पोर्ट्सने दिला आहे.
अनेक ठिकाणी झाडे कोसळली
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर झाडे पडण्याच्या तसेच विजेच्या तारांवरही झाडे कोसळली. जुने गोवे येथे वीज तारांवर झाड पडल्यामुळे मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. मात्र संबंधित खात्याकडून तसेच अग्निशामक दलाकडून खबरदारी घेऊन वेळीच पुरवठा बंद करून झाड हटविण्यात आले. वाळपईत रस्त्यावर झाडे पडण्याचे प्रकार घडल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.
मंगळवारपर्यंत यलो अलर्ट
दरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देऊन भारतीय हवामान खात्याकडून तीन दिवसांपूर्वीच यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. हा अलर्ट २८ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी जोरदार पावसाची शक्यता आहे.
'मोंथा'चा प्रभाव
बंगालच्या उपसागरात 'मोंथा' चक्रीवादळ आकार घेत आहे. सध्या हे वादळ चेन्नई किनाऱ्यापासून आग्नेय दिशेला ९१० किमी अंतरावर असून यामुळे तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. सोमवारी पहाटेपर्यंत त्याची गती वाढून ते चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून म्हटले आहे. हा तीव्र पट्टा वायव्येच्या दिशेने सरकत असून ताशी ६५ किमीपर्यंत वेग वाढल्यांतर चक्रीवादळाचे नामकरण 'मोंथा' असे होईल. ते २८ ऑक्टोबरला आंध्र किनारपट्टीला धडकेल असा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र, कर्नाटकसह गोवा व कोकणातही जाणवेल. या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे.