एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:55 IST2025-10-11T07:55:20+5:302025-10-11T07:55:31+5:30
आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू

एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/मडगाव : गोमेकॉवर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. मात्र, सरकारी इस्पितळांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. शुक्रवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पॅलिएटिव्ह मेडिसिन सुविधा व उच्चस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, 'पॅलिएटिव्ह मेडिसिन सुविधेत गोवा राज्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतातील काही राज्यस्तरीय धोरणांपैकी ते एक आहे. तेवा फार्मास्यूटिकल्सच्या सहकार्याने या प्रकल्पाला पाठिंबा मिळाला आहे. पॅलिएटिव्ह मेडिसिन सुविधा पुरवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना हा आजार आहे, त्यांच्यादृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठीचे धोरण, आराखडा आम्ही ठरवत आहोत. देशातील प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सुविधा मिळावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यांचे हे ध्येय आम्ही यशस्वीपणे पुढे नेत आहोत.'
आरोग्यमंत्री म्हणाले की, 'दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ तसेच अन्य इस्पितळांमध्ये चांगल्या सुविधा तसेच आरोग्य यंत्रणा सक्षण करण्यावर भर दिला जात आहे. जिथे आवश्यक आहे, तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जात आहे. तुये येथील सामुदायिक आरोग्य इस्पितळातील सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असून त्यासंबंधीच्या फाइल्स सरकार दरबारी असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात १० दिवसांत परिचारिका नियुक्ती
दरम्यान, सध्या जनतेच्या आरोग्य क्षेत्राकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सरकार लोकांना चांगली आरोग्यसेवा देत आहे. राज्यात सुमारे १०० रुग्णवाहिकांची, इस्पितळांत कर्मचाऱ्यांची गरज आहे. हा ताण दूर करण्यासाठी नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. काही फाइल्स मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. मडगावमध्ये दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात १० दिवसांत रुग्णालयात परिचारिका तसेच इतर डॉक्टरांची नियुक्ती करू अशी घोषणा त्यांनी केली. शुक्रवारी टेलिमानस कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आरोग्यमंत्री राणे यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील प्रलंबित गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी तुटवड्याच्या प्रश्नाबाबत भाष्य केले. रुग्णालयाची उर्वरित कामे लवकरच तडीस लागतील असेही ते म्हणाले.
गोमेकॉवरही ताण वाढत आहे. इतर ठिकाणीही तशीच स्थिती आहे. आम्ही कर्मचाऱ्यांची तसेच डॉक्टरांची संख्या वाढवूनसुद्धा ताण जाणवत आहे. रात्रीच्यावेळीही डॉक्टर ऑपरेशन करीत आहेत. रुग्णांना चांगली सेवा मिळावी, ते बरे व्हावेत यासाठी नेहमीच प्रयत्न असतो. - विश्वजित राणे, आरोग्यमंत्री.