बंधारा नाही, जॅकवेल उभारू, मिराबाग बंधाऱ्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:38 IST2026-03-26T14:37:23+5:302026-03-26T14:38:23+5:30
शिष्टमंडळासोबत भाजपचे नेते माजी खासदार विनय तेंडूलकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते.

बंधारा नाही, जॅकवेल उभारू, मिराबाग बंधाऱ्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेला महिनाभर सुरू असलेल्या मिराबाग बंधारा आंदोलनाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मिराबाग येथील शिष्टमंडळासोबत बुधवारी सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असून लोकांना नको असलेला कुठलाच प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळासोबत भाजपचे नेते माजी खासदार विनय तेंडूलकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते.
विनय तेंडुलकर म्हणाले, मिराबाग बंधाऱ्याबाबतचे सुमारे ९९ टक्के प्रश्न निकाली काढले आहेत. तेंडुलकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी जॅकवेलमार्फत पाणी उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
तेथे बंधारा, बार्ज किंवा पंपिंग स्टेशन उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे स्थानिकांनी कोणतीही चिंता करू नये, स्थानिकांनी आता अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपल्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचेही तेंडुलकर यांनी सांगितले. तसेच सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
मिराबाग बंधाऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच : दामू नाईक
दामू नाईक म्हणाले, मिराबाग बंधाऱ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आता तो सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नावर योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकारी तसेच मिराबाग परिसरातील स्थानिक नागरिकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.