गोव्यात नववर्षाच्या स्वागताची धूम, सेलिब्रेटी दाखल; किनाऱ्यांवर हाऊसफुल्ल गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:03 IST2025-12-31T08:03:26+5:302025-12-31T08:03:58+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा राज्य पूर्णपणे सज्ज झाले आहे. देशी-विदेशी पर्यटकांनी राज्यात गर्दी केली असून गेल्या दोन दिवसांपासूनच किनारी भागात पर्यटकांची रिघ लागली आहे.

गोव्यात नववर्षाच्या स्वागताची धूम, सेलिब्रेटी दाखल; किनाऱ्यांवर हाऊसफुल्ल गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा राज्य पूर्णपणे सज्ज झाले आहे. देशी-विदेशी पर्यटकांनी राज्यात गर्दी केली असून गेल्या दोन दिवसांपासूनच किनारी भागात पर्यटकांची रिघ लागली आहे. आज, सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्यांमुळे याचे प्रमाण दुप्पट होणार आहे. राज्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने नववर्षाची धूम राज्यात असणार आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती राज्यात असेल. खास करून बागा, कळंगुट, हडफडे, कांदोळी, वागातोर, पाळोळे, काब द राम, गालजीबाग या किनाऱ्यांवर तसेच कॅसिनो असलेल्या ठिकाणी कलाकारांची मंदियाळी असणार आहे. सैफ अली खान, करिना कपूर खान, प्रियंका चोप्रा-जोनस, मलायका अरोरा, काजल अगरवाल, सनी लियोन, आदित्य रॉय कपूर, अर्जुन रामपाल, इशा देओल, रकुल प्रीत सिंग, सोफिया चौधरी, खुशी कपूर, वेदांग रैना, रफ्तार, नवराज हंस, नर्गीस फखरी, सपना चौधरी, तमन्ना भाटिया, सोनम बाजवा यांसारखे कलाकार राज्यात दाखल होत आहे. यातील काही कलाकार दोन दिवसांपासूनच राज्यात दाखल झाले आहेत.
किनारे फुल्ल, जीवरक्षकांच्या संख्येत वाढ
पर्यटक दाखल झाल्याने राज्यातील सर्व किनारे फुल्ल झाले आहेत. किनारपट्टी सुरक्षेसाठी दृष्टी मरीन संस्थेने कंबर कसली आहे. राज्यभर ४५० हून अधिक जीवरक्षक आणि ७० बीच मार्शल्स तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय गर्दी व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी रात्री एक वाजेपर्यंत वाढीव शिफ्टमध्ये काम करतील. दक्षिण गोव्यात ७० जीवरक्षक व १४ मार्शल्स, तर उत्तर गोव्यात ६५ जीवरक्षक व १९ मार्शल्स तैनात असतील. दृष्टी मरीनकडून उत्तर गोव्यात २४ आणि दक्षिण गोव्यात २० जीवरक्षक टॉवर्स कार्यरत आहेत.
सुरक्षेसाठी अतिरिक्त जीप्स, जेट स्कीज तसेच एईडि मशिन्स, सीपीआर किट्स, रेस्क्यू बोईस आणि रेडिओ यांसारखी अत्याधुनिक बचाव साधने उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
वाहतूक नियंत्रणासाठी ९०० पोलिस रस्त्यावर
नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले असल्याने पणजी, म्हापसा, मडगाव या शहरांतील मुख्य रस्ते मंगळवारपासूनच गजबजून गेले आहेत. बुधवारी वाहनांची वर्दळ आणखी वाढेल. त्यामुळे वाहतूक व्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने ९०० हून अधिक पोलिस रस्त्यावर उतरविले आहेत.
वाहतूक विभागाचे अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की पर्यटकांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाल्याने २३ डिसेंबरपासूनच रस्त्यावर अधिक कर्मचारी ठेवले आहेत. ३१ डिसेंबरला त्यांची संख्या अधिक असेल. पोलिस महासंचालकांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीला विशेष बळ उपलब्ध करून दिले आहे. ९०० हून अधिक पोलिस वाहतूक व्यवस्था पाहतील. वरिष्ठ अधिकारीही या काळात रस्त्यावर उतरतील अशी माहिती शिरवईकर यांनी दिली. याशिवाय जिल्हा पोलिसांचे बळही वाहतूक नियंत्रणासाठी मिळणार आहे असे सांगण्यात आले.