एकीचे नवे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:55 IST2026-02-12T11:54:03+5:302026-02-12T11:55:14+5:30

अलीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजित राणे जाहीर कार्यक्रमांमध्ये एकाच व्यासपीठावर येत आहेत.

new experiments of unity of cm pramod sawant and vishwajit rane | एकीचे नवे प्रयोग

एकीचे नवे प्रयोग

अलीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजित राणे जाहीर कार्यक्रमांमध्ये एकाच व्यासपीठावर येत आहेत. काही दिवसांपूर्वी तुये येथे इस्पितळ इमारत उद्घाटनावेळी ते एकत्र होते. त्यानंतर काल वाळपई येथे आधुनिक फायर स्टेशन इमारतीच्या उ‌द्घाटनाप्रसंगी दोघांनीही एकत्र येत मैत्रीचे दर्शन घडविले. प्रत्येक सोहळ्यात दोन्ही नेते जाहीर करत आहेत, की आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एक आहोत, संघटित आहोत. 

वास्तविक दोन्ही भाजपचेच नेते आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्या मंत्रिमंडळात विश्वजित क्रमांक दोनचे मंत्री आहेत. दोन्ही नेत्यांनी एकत्र असायलाच हवे, पण आम्ही एक आहोत असे सांगण्याची वेळ का यावी, ते लोकांना कळत नाही. सत्तरीबाहेरील कुणी तरी गैरसमज निर्माण करतोय, आमच्यात विसंवाद नाही, आम्ही संघटित आहोत असे काल वाळपई येथे बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले. विश्वजित राणे व पर्येच्या आमदार दिव्या राणे यांच्याकडून सत्तरीच्या विकासासाठी व लोकसेवेसाठी खूप कष्ट घेतले जात आहेत असे प्रशस्तिपत्रही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

सत्तरीचे लोक चांगले आहेत, गेल्या झेडपी निवडणुकीवेळी लोकांनी सत्तरीच्या दोन्ही आमदारांवर जास्तच प्रेम दाखविले, मोठ्या प्रमाणात मते दिली असे नमूद करायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही स्तुती ऐकून मंत्री विश्वजित प्रचंड खूश होतील असे म्हणण्याचे कारण नाही. कारण राजकारणात विश्वजितने खूप पावसाळे अनुभवले आहेत. सत्तरी तालुक्यातील युवा-युवतींना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. कर्मचारी भरती आयोगामुळे सध्या नोकरभरतीची गाडी हवी तशी रुळावर येत नाही, अशी खंत सत्तरी तालुक्यातील अनेकजण व्यक्त करतात. याउलट मुख्यमंत्री सावंत पूर्णपणे कर्मचारी भरती आयोगाचे समर्थक आहेत. हा आयोग कायम राहील अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, हे अनेक आमदारांच्या लक्षात आलेले आहे. मात्र, हा आयोग विश्वजितसह अन्य काही मंत्र्यांना अडचणीचा वाटतो. 

मुख्यमंत्री मात्र सांगतात की आयोगामार्फत उमेदवारांची गुणवत्ता पाहूनच नोकऱ्या दिल्या जातात. मेरिटवर जर नोकऱ्या मिळत असतील तर आयोगाचे समर्थन करावेच लागेल, असे काही विचारी लोक बोलतात. कर्मचारी भरती आयोगाचा विषय मंत्री राणे यांनी यापूर्वी भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांसमोरही मांडलेला आहे. मध्यंतरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन गोव्यात आले होते, त्यावेळीही विश्वजितसह अनेक आमदारांनी हा विषय मांडला. मात्र, सर्व राज्यांमध्ये अशा प्रकारचा कर्मचारी निवड आयोग असायलाच हवा, ही पंतप्रधानांची भूमिका आहे. त्यामुळे गोव्यातील आयोग काही रद्द होणार नाही हे आता पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे. 

गोवा विधानसभा निवडणूक पुढील दहा-बारा महिन्यांत होणार आहे. उत्तर गोव्यातील दोन तालुक्यांत तरी मंत्री विश्वजित यांचे समर्थक आहेत. विश्वजितने काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरच डिचोली व सत्तरी या तालुक्यांत काँग्रेसचे काम गारद झाले. विश्वजित भाजपमध्ये राहणे हे साखळीचा विचार केल्यास मुख्यमंत्र्यांसाठीही सोयीचे आहे. अर्थात विश्वजित असो, मायकल लोबो असो किंवा बाबूश मोन्सेरात; हे सगळे भाजपमध्येच राहतील. २०२७ ची निवडणूक जर या नेत्यांनी संघटितपणे लढविली तर मुख्यमंत्र्यांसाठीही ते उपयुक्त ठरेल, हे वेगळे सांगायला नको. तुये येथील कार्यक्रमावेळी विश्वजितने मुख्यमंत्र्यांचा हात हाती घेतला. दोघांनीही हात उंचावून मीडियाला फोटो दिला. पहा आम्ही कसे एकत्र आहोत, आमच्यात वाद नाहीच असे दाखवून देण्याचा प्रयत्न झाला. काल वाळपईत दोन्ही नेत्यांनी मनोमीलनाचा सुखद अनुभव लोकांना दिला. 

काहीजण वेगळ्या बातम्या देत असले, तरी आमच्यात वाद नाही, आम्ही एकत्रच आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. विश्वजित यांनी तर भाषणात सांगितले की- आम्ही एकत्र राहून पुन्हा एकदा भाजपला सत्तेवर आणू, अर्थात मुख्यमंत्री सावंत व विश्वजित यांच्यात कोणती स्पर्धा आहे किंवा नाही हे लोकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्यात एकी कायम राहो, असे भाजपची कोअर टीमदेखील म्हणेल. अर्थात एकी किंवा युती केवळ देखाव्यापुरती असू नये एवढीच लोकांची अपेक्षा असेल. जाहीर सोहळ्यांमध्ये विश्वजित नेहमी मुख्यमंत्र्यांचा मान राखतात, त्यांच्या लक्षात आले आहे. काल तर दोन्ही नेते टेबल टेनिसदेखील खेळले. त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. हे खेळणे, बागडणे, मैत्री, एकी सगळे खरेखुरे असेल तर निश्चितच टिकाऊ ठरेल.
 

Web Title : एकता के नए प्रयोग: मुख्यमंत्री और मंत्री साथ, मतभेद नकारा

Web Summary : गोवा के मुख्यमंत्री और एक प्रमुख मंत्री सार्वजनिक रूप से एकता दिखाते हैं, मतभेदों का खंडन करते हैं। एक ही पार्टी से होने के बावजूद, एकजुटता पर जोर देने की आवश्यकता सवाल उठाती है। भर्ती प्रक्रियाओं पर अलग-अलग विचारों के बीच विकास और रोजगार सृजन पर ध्यान केंद्रित किया गया है। भविष्य के चुनावों के लिए गठबंधन महत्वपूर्ण हैं।

Web Title : New Unity Experiments: CM and Minister Together, Differences Denied

Web Summary : Goa's CM and a key minister publicly display unity, denying rifts. Despite being from the same party, the need to emphasize cohesion raises questions. Focus is on development and job creation amidst differing views on recruitment processes. Alliances are seen as crucial for future elections.