मतदारयादीमध्ये नवा घोळ; इंग्रजीतून देवनागरीत भाषांतरात अनेक चुका, नावे वगळली जाण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 08:23 IST2025-02-26T08:23:23+5:302025-02-26T08:23:23+5:30
नव्या आणि जुन्या अशा सर्वच मतदारांबाबत हा प्रकार घडला आहे. मतदारांचा मनःस्ताप वाढला आहे.

मतदारयादीमध्ये नवा घोळ; इंग्रजीतून देवनागरीत भाषांतरात अनेक चुका, नावे वगळली जाण्याचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : निवडणूक आयोगाने इंग्रजी भाषेतील मतदार याद्यांतील नावे देवनागरीत लिपीत रुपांतरीत केली आहेत. मात्र भाषांतराच्या या प्रक्रियेत अनेक चुका घडल्याने याद्यांमध्ये घोळ निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या चुकांचे परिणाम मतदारांना सहन करावा लागणार आहे. जर या चुकांची दुरुस्ती वेळीच न झाल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे मतदारांचा मनःस्ताप वाढला आहे.
नव्या आणि जुन्या अशा सर्वच मतदारांबाबत हा प्रकार घडला आहे. काही घरांत दोनपेक्षा जास्त मतदार असलेल्या ठिकाणी एक नाव व्यवस्थित असले तरी दुसऱ्या मतदाराचे नाव किंवा घर नंबर चुकीचा लिहिला आहे. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचे देवनागरीत रुपांतर केले आहे. मात्र, त्यात अनेक चुका आढळून येत आहेत. या चुकांतील बहुतांश ठिकाणी घर क्रमांकाच्या जागेत देवनागरीतील याद्यात अनेकांचे घर नंबर गायब झाले आहेत. काहींच्या घर क्रमांकासमोर प्रश्नचिन्ह दाखविण्यात आले आहे. काहींच्या नावातील दुसरे किंवा पालकांचे नाव गायब झाले आहे तर काहींच्या गावातही चुका झाल्याचे आढळून आले आहे.
बीएलओंकडून दुरुस्ती
यादीतील चुकांच्या दुरुस्तीचे काम आयोगाने नेमणूक केलेल्या बीएलओंकडे सुपूर्द केले आहे. हे काम १७ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे. दुरुस्ती करणाऱ्या बीएलओंकडून आधारकार्ड ग्राह्य धरले जात नसून इतर कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यात लग्नाचा दाखला, नावावर घर असल्यास त्याचे कागदपत्र किंवा इतर कागदपत्रांचा त्यात समावेश होतो.
मतदारांमध्ये संताप
आयोगाने केलेल्या चुकीचे नाहक परिणाम सहन करावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्रस्त मतदारांकडून देण्यात आली. या दुरुस्त्या आयोगाकडून इंग्रजीतील याद्यानुसार कराव्यात, असेही मतदारांकडून सांगण्यात आले.
मतदार यादीमध्ये नावे, घर क्रमांक याबाबत असा काही प्रकार अद्याप आमच्या निदर्शनास आलेला नाही. जर असे काही घडले असेल तर त्याची योग्य दखल घेतली जाईल. - अनंत मळीक, मामलेदार, बार्देश