नवरात्र उत्सव, मखरोत्सव आजपासून सुरू; गोव्यात आगळी-वेगळी अन् विशेष परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:18 IST2025-09-22T12:17:56+5:302025-09-22T12:18:29+5:30

नऊ दिवस चालणारा देवीचा उत्सव, आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात.

navratri festival makharotsav begins from today different and special traditions in goa | नवरात्र उत्सव, मखरोत्सव आजपासून सुरू; गोव्यात आगळी-वेगळी अन् विशेष परंपरा

नवरात्र उत्सव, मखरोत्सव आजपासून सुरू; गोव्यात आगळी-वेगळी अन् विशेष परंपरा

मुकेश थळी, साहित्यिक, कोशकार

आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे. गोव्यातील अनेक मंदिरांत त्यानिमित्त रोज कीर्तन, नंतर मखरोत्सव आणि इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ही एक फार मोठी परंपरा आहे. भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक साधना यात नवरात्रीचे महत्त्व अगाध आहे. नऊ दिवस चालणारा देवीचा उत्सव, आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. देवीच्या शारदीय नवरात्रीचा उत्सव भारताच्या बहुतेक सर्व भागांत रूढ आहे.

नवरात्राचा उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. दुर्गा किंवा काली शक्तीची उपासना आराधना नवरात्रीच्या काळात होते. पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. घटावर देवीची स्थापना करतात. देवी हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. स्त्री एका नवीन जिवाला जन्म देते, नंतर त्या
जिवाचा प्रवास सुरू होतो. घटस्थापनेपासून हीच प्रक्रिया दाखवली जाते. नवरात्रीचे आसन हे दिव्य आसन आहे. मखरावर खास नक्षीकाम व सजावट केलेली असते. अनेक भाविक या काळात दुर्गा सप्तशतीची पारायणे करतात.

दुर्गादेवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर या राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्र उत्सव केला जातो. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही दुर्गेची तीन महत्त्वाची रूपे आहेत असे उल्लेख, संदर्भ ग्रंथात मिळतात. बंगालमध्ये काली देवीचे उपासक अधिक आहेत. त्यामुळे तेथे हा नवरात्र उत्सव विशेष प्रकारे साजरा केला जातो. 

या उत्सवास दुर्गापूजा वा पूजा-उत्सव म्हणतात. गोव्यात चवथ हा जसा मोठा सण तशीच बंगालात दुर्गापूजा. मोठमोठे पंडाल उभारून त्यात दुर्गा देवीची मोठी मूर्ती स्थापन करतात. बंगालचा हा सर्वांत मोठा सण. दिवाळी अंक जसे महाराष्ट्रात येतात तसे बंगाली भाषेत दुर्गापूजा काळात साहित्याची मेजवानी घेऊन विशेष अंक येतात. 

फोंडा तालुक्यात नवरात्रीच्या दिवसात मखरोत्सवाची उत्साही धामधूम असते. मखर फिरवताना आरती होतात व ते एक विलोभनीय दृश्य असते. अनुभवण्याजोगे. हल्ली मंदिरात गर्दी जास्त झाल्यास बाहेर मोठा स्क्रीन लावतात. माझ्या लहानपणी नवरात्र उत्सव व त्यातील कीर्तन ही एक मोठी पर्वणी असलेला अनुभव होता. म्हार्दोळला मी आजोबांसोबत श्री महालसा मंदिरात जात असे. कीर्तनकार बहुधा गोव्याबाहेरील असत. हरिकथा कथन करण्यात व भक्तिसंगीत गाण्यात ते तरबेज असत. असेच एक हभप कीर्तनकार आले होते. 

रात्रंदिन मन राघवीं असावे या अभंगातील पहिल्याच ओळीवर त्यांनी नऊ दिवस रसाळ भक्तीरूपी निरूपण केलं. पुढची ओळ होती-चिंतन नसावे कांचनाचे. कांचन म्हणजे धन हा बोध तेव्हाच झाला. हा अभंग रामदासस्वामींचा हे नंतर समजलं. एक आठवडाभर मला आठवण आहे, बाजारात सर्व दुकानात हीच चर्चा चालू होती. 

म्हार्दोळ राममय झाले होते. कीर्तन हा नवविधा भक्तीचा एक प्रकार आहे. तो रस खऱ्या अर्थाने म्हार्दोळात संचारला होता. अनेक कीर्तनकार ऐकले. भाविकांना भक्तिरसात रंगवून गुंतवून ठेवण्याची कला निरूपणकाराला अंगभूत असावी लागते. ताल, लय, सूर, संगीत यांचीही जितकी खोल जाण तितके कीर्तन रसपूर्ण.

नवरात्र या संस्कृत शब्दाचा अर्थ नऊ रात्री. आजपासून देवीशक्तीचे भक्ती साम्राज्य सुरू होतं. 'मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव' असे एक भक्तिगीत आहे. स्वच्छ, निर्मल हृदय व त्यात भाव असेल तरच त्या हृदयाला दैवीशक्तीचा अनुभव होईल. शुद्ध अंतःकरण हे देवीचे अनुपम आसन होय. त्या आतील स्वच्छतेवर भर देऊ. सुखशांती आनंदाचा पाऊस बरसेल.

 

Web Title: navratri festival makharotsav begins from today different and special traditions in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.