Myth: Sitaiyan's first presentation in Goa | वनकथा : सीतायनचे प्रथमच गोव्यात सादरीकरण
वनकथा : सीतायनचे प्रथमच गोव्यात सादरीकरण

दुर्गाश्री सरदेशपांडे 
पणजी : अनुज वैद्य हे सॅन फ्रान्सिस्को येथे २००८ पासून दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचे उपसंचालक आहेत. ते कलाकार आणि मीडिया क्युरेटर आहेत. विविध कलाकृतींव्दारे ते लिंग, लैंगिकता व पर्यावरण या विषयांवर भाष्य करतात. ते सध्या त्यांचे वनकथा : सीतायन या सादरीकरणासाठी चर्चेत आहे. ही कथा विविधांगांनी विकसित केल्यामुळे खूप रोचक आहे. ते अमेरिकेत स्थायिक असल्यामुळे त्यांनी अनेकदा तेथे त्याचे सादरीकरण केले आहे. भारतात अशाप्रकारचे सादरीकरण पहिल्यांदाच होत असून गोवा राज्यात हे होत आहे. ‘दज क्रिटिक’ या संस्थेतर्फे रेईश मागूश किल्ला येथे वनकथा: सीतायन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. यानिमित्त अनुज वैद्य यांच्याशी साधलेला संवाद....
रामायणाचा अन्वयार्थ वनकथा असा लावण्यामागे तुमचा काय विचार आहे?
-आम्हाला प्रत्येक गोष्ट मानवी दृष्टीने पाहण्याची सवय जडली आहे. सीता धरतीपुत्री आहे. त्यामुळे तिला कथेच्या प्रारंभी रोपट्याच्या रूपात दाखवले आहे. पौराणिक कथेला मी इतिहासाचा भाग समजतो. कारण पर्यावरण व मानव यांच्या आंतर संबंधांबद्दल माहिती मिळते. पौराणिक कथेला आजवर शहरी रुपात लिहिण्यात आले आहे. मी रामायण पुन्हा वाचत असताना वनाशी असलेले मानवाचे संबंध लक्षात आले व या कहाणीला वनकथा असे नाव मी दिले.
ही कथा कशाप्रकारे विकसित केली?
उ. वन म्हणजे जटिल प्रणाली आहे. त्यात विविध प्राणी व झाडे आली. त्यामुळे वनाची कथा सांगत असताना या सर्वांना सामावून घेणे आवश्यक आहे व सर्वच समान आहेत. तसेच हे सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहेत. मी लिहिलेली कथा जरी विविधांगांनी विकसित झाली असली तरी हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून कथा लिहिणे माझ्यासाठी अवघड नव्हते. आम्हाला प्रत्येक गोष्टीला साचेबध्द करण्यात जास्त रुची असते. लिंगाच्या आधारावर, तृतीय पंथी तसेच विशेष लोकांनाही एका नावाच्या साच्यात बंदिस्त केले जाते. मानवाच्या या विविध पैलूंना सहजसुंदर बनवून सर्वसमावेशक कथा बनविण्याचा माझा विचार होता.
ही वनकथा रामायणाहून कशी वेगळी आहे.
उ. इतर रामायणाहून तर ही कथा खूप भिन्न आहे. यात सीता वनाच्या रूपात दाखवली आहे. रामायणात स्वयंवरावेळी रामाने शिवधनुष्य उचल्यावर सीतेसोबत त्याचा विवाह होतो. या कथेत राम संगीताचा आधार घेऊन सीतेचे मन जिंकतो. त्यानंतर सीतेला मानव रूपात दाखवले आहे. विवाहानंतर सीता व राम अयोध्याला जातात आणि वनराई मागेच राहते. अगदी आजकाल चाललंय तसे. ही कथा समकालीन आहे. आज अनेक जीव लुप्त होत आहेत. या कथेत जटायू पुन्हा जीवंत होऊन या जीवांविषयी बोलतो.
या प्रवासाविषयी आर्थिक गणित कसे जुळवले?
उ. या प्रवासाची सुरुवात २०१२ साली झाली होती व ती आजही कायम आहे. ब्रिटिश सरकारच्या २०१० सालच्या अहवालानुसार सिनेमाजगत जास्त प्रदूषणकारी उद्योग आहे. त्यामुळे प्रदूषणरहित कथा कशी सादर करायची, याचा विचार माझ्या मनात होता. २०१३ साली न्यू जर्सीमध्ये माझ्या भावासोबत राहून मी विविध प्रयोग करू लागलो, तेव्हा ही सादरीकरणाची कल्पना सुचली. वस्तूंचा पुनर्वापर करण्यावर माझा भर असतो. तसेच सध्या मी परफॉर्मन्स आर्टमध्ये कॅलिफोर्नियात पीएच.डी. करत आहे. त्यामुळे त्या स्रोतांचीही मदत होते.

Web Title: Myth: Sitaiyan's first presentation in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.