माझा मूळ पिंड भाजपाच, योग्य मुहूर्तावर घरवापसी करणार: लक्ष्मीकांत पार्सेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:29 IST2025-09-16T11:27:59+5:302025-09-16T11:29:14+5:30
पार्सेकर यांचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत.

माझा मूळ पिंड भाजपाच, योग्य मुहूर्तावर घरवापसी करणार: लक्ष्मीकांत पार्सेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्यास अवश्य त्याचा विचार करीन. योग्य मुहूर्तावर घरवापसी होईल, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी स्पष्टपणे पत्रकारांना सांगितले.
पार्सेकर हे भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याच्या वृत्तावरून पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, 'काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच घडतात. भाजपने प्रस्ताव दिला तर विचार करण्यास काहीच हरकत नाही. योग्य मुहूर्तावर घरवापसी होईल.' मांद्रेतील रस्त्यांची दुर्दशा तसेच कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल विचारले असता त्यावर काही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. ते म्हणाले की 'जी काही वस्तुस्थिती आहे ती प्रसारमाध्यमांमधून दिसून येते.'
दरम्यान, पार्सेकर यांचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. दामू यांनीही अनेकदा पक्षापासून दूर गेलेले जुने तसेच निष्ठावंत नेते, कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्याची संकल्प केलेला आहे. त्यामुळे पार्सेकर यांची घरवापसी लवकरच होईल, हे निश्चित मानले जाते. तसे झाल्यास २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातील लढत रंगतदार होणार आहे.
भाजपसाठी कुटुंबाचा दुरावाही सहन केला....
पार्सेकर यांनी याआधीही असे स्पष्ट केलेले आहे की, आपला मूळ पिंड हा भाजपचाच आहे. पक्षासाठी आपल्याला बारा वर्षे घरही सोडावे लागले होते. आपले कुटुंब महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे समर्थक होते व आपण भाजपवासी झालो तेव्हा आपल्याला कुटुंबामध्ये दुरावा सहन करावा लागला होता.