स्वकीयच मला डावलू पाहात आहेत, त्यांनी कारस्थान थांबवावे: श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 09:28 IST2023-04-12T09:27:54+5:302023-04-12T09:28:13+5:30
उत्तर गोव्यात उमेदवार बदलणार या अफवा

स्वकीयच मला डावलू पाहात आहेत, त्यांनी कारस्थान थांबवावे: श्रीपाद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपमधील काहीजण मला डावलू पहात आहेत. माझ्या पाठीमागे छुप्या कारवाया चालू आहेत. मला बाजुला काढून कोणीतरी माझ्या जागी येऊ पहात आहे. लोकसभेसाठी उत्तर गोव्यात भाजप उमेदवार बदलणार अशा वावड्या उठवल्या जात असून या अफवा आहेत.
उमेदवार निवडणुकीच्या सुमारे पाच महिने आधी ठरतो, असे विद्यमान खासदार तथा पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.
पक्षांतर्गत काही मंडळी आपल्याविरोधात कारवाया करत आहेत, अशी नाराजी श्रीपाद यांनी प्रथमच उघडपणे व्यक्त केली आहे. मध्यंतरी नूतनीकरण केलेल्या दोनापावल जेटीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास डावलल्याने त्यांनी स्वकीयांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. येत्या १६ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फोंडा तालुक्यात जाहीर सभा होणार आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच उत्तर गोवा मतदारसंघात भाजप यावेळी नवीन चेहरा देणार असल्याच्या वदंता पसरल्या आहेत.
श्रीपाद म्हणाले की, उमेदवार निवडण्यासाठी भाजपची प्रचलित पध्दत आहे. त्यानुसार पक्षाचे संसदीय मंडळ निवडणुकीला किमान पाच महिने असताना उमेदवार निश्चित करील. काहीजण तिकिटावर दावा करीत आहेत. पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर सोपविल ती पार पाडण्याची माझी तयारी आहे.
घाणेरडी खेळी करू नका
पाचवेळा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले श्रीपाद म्हणाले की, सहसा विद्यमान खासदाराला उमेदवारी डावलली जात नाही. मी या मतदारसंघातून अनेकदा सातत्याने निवडून येत आहे. पण, भाजपमधीलच काहीजण माझ्या मागे छुप्या कारवाया करीत आहेत याची कल्पना मला आहे. त्यांनी घाणेरडी खेळी करु नये, असे माझे त्यांना आवाहन आहे.
माझा प्रचार सुरु
प्रसार माध्यमांनी श्रीपाद यांना या विषयावर बोलते केले. भाजप यावेळी उमेदवार बदलणार अशी चर्चा आहे. त्याबद्दल आपले मत काय, असे विचारले असता ते म्हणाले की, अजून उमेदवार निश्चित झालेला नाही आणि जर का कोणी उमेदवार ठरला असल्याचे सांगत असतील तर ते अफवा पसरवत आहेत. मी लोकसभेसाठी माझा प्रचार सुरु केलेला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"