'एआय'द्वारे माझ्या स्वयंपाक्याने लिहिली 'मिस्टर इंडिया-२'ची कथा: शेखर कपूर
By वासुदेव.पागी | Updated: November 26, 2025 11:56 IST2025-11-26T11:55:02+5:302025-11-26T11:56:55+5:30
एआयमुळे बदलत्या सिनेमावर मास्टरक्लासमध्ये चर्चा; एआय फिल्मचे समर्थन

'एआय'द्वारे माझ्या स्वयंपाक्याने लिहिली 'मिस्टर इंडिया-२'ची कथा: शेखर कपूर
वासुदेव पागी, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सिनेमा अत्यंत लोकशाहीवादी' असल्याचे शेखर कपूर यांचे विधान हे इफ्फी २०२५ च्या पाचव्या दिवशी चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. 'द न्यू एआय सिनेमा : जनरेटिव्ह एआय आणि मोठ्या भाषा मॉडेल्सवरील संवाद' या मास्टरक्लासमध्ये शेखर कपूर यांनी केलेले हे विधान केले. आपल्या स्वयंपाक्याने एआय वापरून 'मिस्टर इंडिया फिल्म पार्ट २'ची कथा लिहिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
एकीकडे एआयमुळे मानवी सर्जनशीलतेचा बळी दिला जात असल्याचे दावे होत असताना शेखर कपूर यांनी उघडपणे एआय फिल्मचे समर्थन केले आहे. एआय हे संपूर्ण फिल्म उद्योगासाठी दिशा बदलणारे ठरू शकते, असे ते म्हणतात. ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता आता फिल्म मेकिंगमधील पारंपरिक अडथळे दूर करत असून, कोणताही सामान्य व्यक्ती आता कथा, पटकथा आणि दृश्यनिर्मितीत सहज सहभागी होऊ शकतो. त्यांनी दिलेले उदाहरण विशेष लक्षवेधी ठरले. त्यांच्या स्वयंपाक्यानेच एआयचा वापर करून मिस्टर इंडिया २ ची कथा तयार केली. कपूर यांच्या या निरीक्षणामुळे एआयमुळे सर्जनशीलतेचे लोकशाहीकरण होईल की व्यावसायिकांचा दर्जा कमी होईल, यावर चर्चेला सुरुवात झाली.
शेखर कपूर यांनी एआय आणि व्हीएफएक्स यातील मूलभूत फरक स्पष्ट केला. व्हीएफएक्स हे केवळ डिजिटल दृश्यनिर्मितीचे तंत्र असून, एआय ही प्रक्रिया शिकून स्वतः सामग्री तयार करू शकणारी बुद्धिमत्ता असल्याचे म्हणाले. त्यात पटकथा, दृश्यवर्णन, संपादनाची रूपरेषा, कॅमेरा आणि लाईटिंगची योजना यांसारख्या सर्जनशील स्तरांवरही साहाय्य मिळते.
प्रश्नोत्तर सत्रात एआय डॉक्युमेंटरी 3 निर्मिती, संग्रहित व्हिडिओंचे पुनर्संचयन, फिल्म शिक्षणातील आधार या बाबींवरही चर्चा झाली. द लॉस्ट लेजंड्स हा एआय-निर्मित लघुपट दाखवून प्रेक्षकांना नव्या तंत्रज्ञानाच्या क्षमतांची झलक देण्यात आली.
एआयद्वारे सादरीकरण
तंत्रज्ञानतज्ज्ञ शंकर रामकृष्णन आणि वी. मुरलीधरन यांनी चॅटजीपीटी, गुगलचे जेमिनी आणि इतर एआय साधनांचा सिनेमातील प्रत्यक्ष वापर दाखवून दिला. पटकथालेखन, स्टोरीबोर्ड तयार करणे, दृश्यांचे वर्णन, शॉट डिझाइन यांसारख्या टप्प्यांमध्ये एआय कसे मदत करते हे त्यांनी सांगितले. त्यांनी द टर्बन अँड द रॉक या एआय-साहाय्यित चित्रपटाचे उदाहरणही सादर केले.
'मिस्टर इंडिया'साठी सन्मान
मास्टरक्लास सत्राच्या सुरुवातीला रवी कोट्टारकारा यांनी शेखर कपूर यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील दूरदर्शी वाटचालीसाठी सन्मान केला. 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील तांत्रिक नवकल्पना आणि त्याचा आजही टिकून असलेला सांस्कृतिक प्रभाव त्यांनी विशेष उल्लेख केला.