राज्यातील नगरपालिका निवडणुका १५ मेच्या सुमारास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:16 IST2026-02-17T13:16:55+5:302026-02-17T13:16:55+5:30
विधानसभा निवडणुका जानेवारीत शक्य

राज्यातील नगरपालिका निवडणुका १५ मेच्या सुमारास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील विविध नगरपालिकांच्या निवडणुका साधारणपणे १५ मेच्या आसपास होण्याची शक्यता असल्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून सध्या एसआर (Special Revision) संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, प्रभाग रचना तसेच इतर तांत्रिक बाबींची पूर्तता आदी सुरू आहेत. प्रभाग आरक्षणही योग्य पद्धतीने होईल. उपलब्ध परिस्थिती लक्षात घेता, १५ मेच्या दरम्यान पालिका निवडणुका पार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी नमूद
केले.
विधानसभा निवडणुका जानेवारीत?
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांबाबत विचारले असता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, सध्याच्या विधानसभेचा कार्यकाल मार्च २०२७ मध्ये पूर्ण होत आहे. मात्र, जानेवारी २०२७ मध्येच निवडणुका घेण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. यासंदर्भात अंतिम निर्णय निवडणूक आयोग आणि संबंधित घटनात्मक प्रक्रियेवर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या चार वर्षात राज्य सरकारने विविध महत्त्वाकांक्षी योजनांना चालना दिली असून विकासाच्या दिशेने राज्याचा आलेख उंचावत आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, उद्योग अशा विविध क्षेत्रांत केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत.
"डबल इंजिन" सरकारच्या माध्यमातून राज्यात आत्मनिर्भरता आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. तसेच सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे पालिका असो किंवा विधानसभा निवडणुका, भाजपला जनतेचा ठाम पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर तापू लागले असून, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.