पाणीप्रश्नी खासदार आक्रमक; विरियातोंची बांधकाम खात्यावर धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 08:16 IST2025-05-15T08:15:56+5:302025-05-15T08:16:09+5:30

मास्टर प्लान तयार करण्याची मागणी

mp aggressive on water issue viriato fernandes visit construction department | पाणीप्रश्नी खासदार आक्रमक; विरियातोंची बांधकाम खात्यावर धडक 

पाणीप्रश्नी खासदार आक्रमक; विरियातोंची बांधकाम खात्यावर धडक 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील अनेक भागांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसून अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नाडिस यांनी बुधवारी या प्रश्नावर बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याची भेट घेऊन पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली. 'आठ दिवस आढावा घेतल्यानंतर पुन्हा आम्ही पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवणार आहोत', असेही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या भेट घेतल्यानंतर खासदार फर्नांडिस यांनी पत्रकारांना सांगितले की, 'प्रत्येक मतदारसंघांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. लोकांना दोन - दोन दिवस पाणी मिळत नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी रोज चार तास पाणी देण्याचे जाहीर केले होते. परंतु सरकारचे कोणतेही नियोजन नाही. पाण्याअभावी लोकांना त्रास सहन करावे लागत आहे.

जमिनींची कॅसिनो मालकांना विक्री

खासदार विरियातो म्हणाले की, 'मेगा प्रकल्पांना परवाने दिले जातात. आलिशान बंगल्यांना स्वीमिंग पूल बांधण्यासाठी परवाने दिले जातात. त्याचा परिणाम पाण्यावर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल, असे जाहीर केले आहे. परंतु प्रत्यक्षात ओलिताखालील जमिनी कॅसिनो मालकांना विकल्या जात आहेत.'

शिरोडा मतदारसंघातही टंचाई

खासदार म्हणाले की, 'खुद्द जलस्रोत मंत्र्यांच्या शिरोडा मतदारसंघांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. काणकोणमध्ये गावडोंगरी सारख्या भागात टँकर ही पोचत नाहीत. सरकारकडे पाण्यासाठी धोरण नाही. महिना १६ हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देण्याची योजना सरकारने स्थगित केली आहे. निवडणुका आल्या की आश्वासने द्यायची व नंतर योजना गुंडाळायची असा हा प्रकार आहे.'

खासदार-आमदारामध्ये पाण्यावरून वाद

पेडणेतील पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी बुधवारी आल्तिनो येथे बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी 'पेडणेत अजूनही पाण्याची समस्या आहे, मात्र सरकार काहीच करत नाही', असे विधान खासदार विरियातो यांनी केले. नेमके त्याचवेळी तेथे पोहोचलेले पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्या विधानाला आक्षेप घेतला. पेडणेत पाण्याची कोणती समस्या नाही, सर्वकाही सुरळीत आहे, असा दावा त्यांनी केला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झडली.

खासदार विरियातो हे पाणीटंचाईच्या प्रश्नावर बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यासाठी आल्तिनो येथील कार्यालयात आले होते. ही भेट झाल्यानंतर बाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नेमके त्याचवेळी आमदार प्रवीण आर्लेकर आपल्या काही कामासाठी या कार्यालयात येत होते. प्रवेशद्वारावरच दोघांचा वाद झाला.

'पेडणेतील पाणी समस्या मुळीच मिटलेली नाही. लोक अजून त्रास सहन करत आहेत, असे विरियातो म्हणाले. धारगळमधील ओलिताखालील जमीन कॅसिनो मालकांना दिली जात आहे, त्यावर बोलत का नाही? अशी विचारणा त्यांनी आमदार आर्लेकर यांना केली. त्यावर काहीही उत्तर न देता आर्लेकर तेथून निघून गेले.

खासदार म्हणाले की, धारगळच्या जमिनीबाबत आर्लेकर तोंड उघडणार नाहीत. कारण ते स्वतः बिल्डर असावेत. पेडणे, धारगळमध्ये पाणी समस्या आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण मी त्या भागात फिरलेलो आहे. वाटल्यास आर्लेकर यांनी या प्रश्नावर माझ्याशी चर्चेसाठी खुल्या व्यासपीठावर यावे.
 

Web Title: mp aggressive on water issue viriato fernandes visit construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.