झेडपी निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाली, इच्छुकांनी लावला जोर; तिकिटाची उत्कंठा शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:18 IST2025-11-16T12:17:43+5:302025-11-16T12:18:36+5:30
आरक्षणामुळे अनेकांकडून पर्यायी मतदारसंघाची चाचपणी तर काहींची पत्नी, बहिणीसाठी फिल्डिंग

झेडपी निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाली, इच्छुकांनी लावला जोर; तिकिटाची उत्कंठा शिगेला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजपचे तिकिट मिळवण्यासाठी उमेदवारांनी जबर फिल्डिंग लावली असून उद्या, सोमवारी उमेदवार जाहीर होणार आहेत. मात्र, यामध्ये पक्षात नव्याने आलेले आणि जुने कार्यकर्ते, यात कुणाला उमेदवारी द्यावी हा पेचप्रंग भाजप पुढे आहे. तर दुसरीकडे तिकिटासाठी उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज्यात अनेक मतदारसंघात उमेदवारीबाबत मोठी समस्या आहे. विशेष करून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदार ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात उमेदवारीचा प्रश्न कठीण बनला आहे. त्यात कुंभारजुवेमधील जुने गोवे, चिंबल मतदारसंघ तसेच बार्देश तालुक्यातील हणजूण, शिवोली आणि सुकूर मतदारसंघात डोकेदुखी वाढणार आहे.
जुने गोवे मतदारसंघात सिद्धेश नाईक यांची उमेदवारी पक्की झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कुंभारजुवे विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग जुने गोवे जिल्हा पंचायत मतदारसंघात येतो. मागील निवडणुकीत सिद्धेश नाईक हे या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षही बनविण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे अध्यक्षपद धाकू मडकईकर यांच्यासाठी सोडले. आता पुन्हा त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे.
सिद्धेश नाईक हे विद्यमान सदस्य असल्यामुळे भाजपकडून तिकिटाचे ते प्रबळ दावेदार आहेत. तसेच सद्यःस्थितीला तिकिटासाठी त्यांचे पारडे जड मानले जाते. तर दुसरीकडे स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांनी नंदकुमार शेट यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली आहे. त्यामुळे जुने गोवेसाठी सध्या तरी भाजपतर्फे सिद्धेश आणि नंदकुमार अशी दोन नावे चर्चेत आहेत.
चिंबलमध्ये तिघांची नावे
चिंबल मतदारसंघ महिला राखीव असल्याने विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उसकईकरांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे चिंबलमधून उसकईकर यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचीच बहीण डॉ. हर्षा उसकईकर यांना भाजपची उमदेवारी मिळावी यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त गौरी कामत आणि हेमांगी गोलतकर यांचीही नावे पुढे आली आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबत निर्णय घेताना भाजप समोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिद्धेश की नंदकुमार ?
सिद्धेश नाईक हे कुंभारजुवे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठीही इच्छुक होते. परंतु पक्षाच्या आदेशावरून त्यांना तो आग्रह सोडून द्यावा लागला होता. मात्र जिल्हा पंचायतीची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आताही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर नंदकुमार शेट यांच्यासाठी आमदार राजेश फळदेसाई फार आग्रही आहेत. त्यासाठी आपले राजकीय वजनही ते वापरत आहेत.
माझी पत्नी निवडणूक लढणार नाहीच : जीत
आपण कधीच राजकारणात घराणेशाहीला थारा देणार नाही. आपण स्वतः आमदार आहे. त्यामुळे आपल्या घराण्यातील कोणीही निवडणूक लढवणार नाही, असे सांगत आमदार जीत आरोलकर यांनी आपली पत्नी अॅड. सिद्धी आरोलकर झेडपी निवडणूक लढवणार नसल्याचे काल स्पष्ट केले. सिद्धी आरोलकर हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. यावर बोलताना आरोलकर म्हणाले की, आपल्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा होती. मात्र, आपली पत्नी ही निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले.