डोंगर कापले, जमिनी विकल्या... आता तरी जागे व्हा!; फर्दिन रिबेलो यांची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 07:54 IST2026-01-16T07:54:28+5:302026-01-16T07:54:40+5:30
आता गावोगावी होणार जागर

डोंगर कापले, जमिनी विकल्या... आता तरी जागे व्हा!; फर्दिन रिबेलो यांची हाक
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : ज्या 'ओपिनियन पोल'ने गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता वाचवली तोच गोवा आज पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मात्र, यावेळचे संकट विलीनीकरणाचे नाही, तर राजकारण्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या निसर्ग आणि जमिनीच्या लुटीचे आहे. त्यामुळे गोमंतकीयांनो आता तरी जागे व्हा, अशी हाक निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी दिली आहे.
स्वयंसेवकांसह ग्राम समित्या स्थापन करणार : फर्दिन रिबेलो
आता केवळ भाषणे करून बदल घडणार नाही, तर प्रत्येक गावात ग्राम समित्या आणि स्वयंसेवकांची फळी उभारण्याची गरज आहे. ही लढाई केवळ पर्यावरणाची नसून ती गोव्याच्या आत्मसन्मानाची आहे. ज्याप्रमाणे ६० च्या दशकात गोव्याने विलीनीकरणाविरुद्ध लढा दिला, तसाच लढा आता भ्रष्टाचाराविरुद्ध देण्याची वेळ आली आहे, असेही रिबेलो म्हणाले.
पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत : उदय भेंब्रे
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांनी खांडोळा येथील एका खासगी कंपनीच्या मेगा प्रोजेक्टचा दाखला देत गोव्याच्या बदलत्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली. ४४ एकरवरील हा प्रकल्प गोव्याच्या मर्यादित साधनसंपत्तीवर ताण आणणारा आहे. आपण जमीन, दुकाने आणि सत्ता परकीयांना विकत आहोत, अशाने उद्याच्या पिढीला आपण काय देणार, असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला.