मध्यप्रदेशातील मोस्ट वॉन्टेड आरोपी ईश्वर मकवानाचे गोव्यातून पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 14:47 IST2018-12-10T14:32:49+5:302018-12-10T14:47:12+5:30
खून, बलात्कार अशा शंभराहून अधिक गुन्ह्यात समावेश असल्याचा आरोप असलेल्या मध्यप्रदेश येथील मोस्ट वॉन्टेड आरोपी ईश्वर मकवाना याने सोमवारी पणजीतील रुग्णालयातून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मध्यप्रदेशातील मोस्ट वॉन्टेड आरोपी ईश्वर मकवानाचे गोव्यातून पलायन
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - खून, बलात्कार अशा शंभराहून अधिक गुन्ह्यात समावेश असल्याचा आरोप असलेल्या मध्यप्रदेश येथील मोस्ट वॉन्टेड आरोपी ईश्वर मकवाना याने सोमवारी पणजीतील रुग्णालयातून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या संशयितावर गोव्यात एका सामूहिक बलात्कार प्रकरणात सुनावणी चालू होती.
ईश्वर मकवाना याला गोव्यातील कोलवाळ येथील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पणजी येथील क्षय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचार घेत असतानाच सोमवारी पहाटे त्याने पलायन केल्याचे उघड झाले. यासंदर्भात कोलवाळच्या एस्कॉर्ट सेलने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या फरार आरोपीच्या शोधात पोलीस आहेत.
ईश्वर मकवाना व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी 24 मे रोजी दक्षिण गोव्यातील बेताळभाटी या बीचवर रात्री असलेल्या निर्जनतेचा फायदा उठवित एका 20 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकरासमोर बलात्कार केला होता. त्यानंतर संशयितांनी हे कृत्य आपल्या मोबाईलवर चित्रीत करुन त्या दोघांकडून एक लाखाची खंडणी मागितली होती. यासंदर्भात कोलवा पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविल्यानंतर फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नवलेश देसाई यांनी सापळा रचून ईश्वरसह राम भारीया व संजीव पाल या तिघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली असता, मध्यप्रदेशातही निर्जनस्थळी येणाऱ्या प्रेमी युगुलांना गाठून आरोपी ईश्वरने कित्येक युवतींवर बलात्कार केला होता. त्याशिवाय अशाच एका प्रकरणात त्याने दोघांचा खूनही केला होता. मध्यप्रदेश पोलिसांचा ससेमिरा सुरू झाल्यानंतर संशयितांनी गोव्यात आश्रय घेतला होता. मात्र गोव्यातही त्यांनी तशाचप्रकारचा गुन्हा केल्याने त्या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिन्ही संशयितांविरोधात मडगावच्या सत्र न्यायालयात सध्या सुनावणी चालू होती.